

Pune News, 08 Jul : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर याच साचलेल्या पाण्यावरून केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असताना गेल्या 3 वर्षांत शहरातील पाणी साठणारी ठिकाणे किती कमी केली? ज्या ठिकाणी कामे केली तिथे पाणी का साचते? असा प्रश्न उपस्थित करत मंत्री मोहोळ यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला आहे. शिवाय पुणेकरांना पावसाळ्यात समस्या निर्माण होईल, असे एकही ठिकाण शहरात नको, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरात पावसाचा बदललेला कल आणि त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मोहोळ यांनी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. शहरात १२० पाणी साठणारी ठिकाणे (क्रिटिकल पॉइंट्स) असून, त्यापैकी ८५ ठिकाणांची कामे पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने केला.
त्यावर, कामे झालेल्या ८५ पैकी किती ठिकाणी यंदा पाणी साचले नाही, असा प्रतिप्रश्न मोहोळ यांनी करताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. या ठिकाणांचे पाऊस सुरू असतानाचे छायाचित्रे पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तर गेल्या काही वर्षांत कमी वेळेत अधिक पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे. या बदलत्या 'ट्रेंड'नुसार महापालिकेने काय तयारी केली, असा प्रश्न देखील मंत्री मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना केला.
लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जनतेला उत्तरे द्यावी लागतात, त्यामुळे दीर्घकालीन नियोजन करून हे प्रश्न सोडवावे लागतील. सिंहगड रस्त्यावरील आपत्कालीन कक्ष तातडीने कार्यान्वित करावा आणि नदीपात्रात 'फ्लड सेन्सर'ची संख्या वाढवा, तसंच वॉर्ड ऑफिसरनी स्थानिक पातळीवर नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना त्यांनी या बैठकीदरम्यान दिल्या.
या बैठकीत शहरातील खड्ड्यांवरही चर्चा झाली. खड्ड्यांची माहिती मिळताच ते तातडीने बुजवण्यासाठी विशेष पथके तैनात ठेवावीत, असे निर्देश देण्यात आले. नागरिकांना खड्ड्यांची तक्रार थेट महापालिकेपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून देण्याची सूचनाही मोहोळ यांनी यावेळी केल्या. तसंच पावसाळ्यत लोकांना रस्ते आणि पाणी साचण्याच्या समस्यांपासून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करावे, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.