

Teacher Appointmen News : पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी १२९ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ३९५ आणि दुसऱ्या टप्प्यातील १२९ अशा एकूण ५२४ शिक्षकांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून शिक्षक भरतीसाठी सुरुवातीला ९९३ रिक्त पदांची माहिती शासनाला देण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेला ४३६ शिक्षक उपलब्ध झाले. त्यापैकी ३९५ शिक्षकांची समुपदेशन प्रक्रियेद्वारे रिक्त शाळांमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या शिक्षकांपैकी १२९ जणांची मंगळवारी समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यांना रिक्त शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.
शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील शाळांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः कमी शिक्षकांवर सुरू असलेल्या शाळांमधील अध्यापनाचा भार कमी होण्याची अपेक्षा आहे. शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन, शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळांमधील शैक्षणिक वातावरण सुधारण्यास मदत होणार आहे.
नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध शिक्षकांनी त्यांना देण्यात आलेल्या शाळांमध्ये तातडीने रुजू व्हावे, यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ नियुक्त्या देण्यापुरती प्रक्रिया मर्यादित न ठेवता शिक्षक प्रत्यक्ष शाळांमध्ये रुजू होऊन अध्यापन सुरू करतात की नाही, याकडेही प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी शिक्षक नियुक्ती प्रक्रियेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगितले. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे रिक्त पदांवर उपलब्ध झालेल्या शिक्षकांना लवकरात लवकर शाळांमध्ये रुजू केल्यास त्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळेल. शिक्षकांची कमतरता दूर करून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.