

Pune News : काँग्रेस नेते आणि पुण्यातील टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वतः याबाबतची घोषणा केली आहे. रोहित टिळक हे टिळक कुटुंबातील राजकीय वारसा असलेले नेते म्हणून ओळखले जातात. लवकरच ते काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना रोहित टिळक म्हणाले, 3 वर्षांपूर्वी त्यांच्या संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानाचा टिळक पुरस्कार देण्यात आला होता. त्या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाने काहीसे अंतर ठेवण्यास सुरुवात केली. या संदर्भात आपण अनेकदा काँग्रेस हायकमांडपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
यादरम्यान माझी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्यात सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता दिसतो. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करायचा हे निश्चित झाले. माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांनी मला राज्यसभेची उमेदवारीही देऊ केली होती. पण महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली.
शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा आणि त्यांचा टिळक कुटुंबाशी असलेल्या स्नेहाचा विचार करून आपण राज्यसभेच्या निवडणुकीमधून माघार घेतली. राज्यसभेसाठी आपण अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आता राज्यसभा हुकल्यानंतर रोहित टिळक यांना एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीची संधी मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.