

Mahadev Jankar: आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्षात युवकांची ताकद वाढणार असून, २०२९च्या लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीत पक्ष सत्तेत असेल असं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे. हा विश्वास व्यक्त करताना त्यांनी आता 'जेनझीं'ना साद घातली असून त्यासाठी एक मोठी घोषणाही केली.
युवकांमध्ये सत्ता बदलण्याची ताकद असून जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन हे सत्ता बदलाचीच नांदी आहे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये सरकारबद्दल तीव्र असंतोष असून, आगामी काळात युवकांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभाग घेतल्यास सत्ता परिवर्तन अटळ आहे. युवकांमध्ये बदल घडविण्याची क्षमता सक्रिय झाल्याचंही जानकर यांनी म्हटलं आहे. यापार्श्वभूमीवर पक्षात जेनझी तरुणांना अधिकाधिका संधी देऊन पक्षाला बळकटी देण्यासाठी रासपच्यावतीनं 'युवा जोडो संकल्प अभियान' सुरु करण्यात येत असल्याची घोषणा महादेव जानकर यांनी केली. या अभियाचा पुण्यातून शुभारंभ झाला असून या कार्यक्रमात ते बोलत होते.
जानकर पुढे म्हणाले,"सत्ता येते व जाते, युवकांना आमदार व खासदार करणे हे आमच्या पक्षाचे ध्येय आहे. ज्यांना आजपर्यंत सत्तेत वाटा मिळाला नाही, त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी पक्षात सर्वांना सामावून घेतलं जाईल. रासप हा कोणाच्याही दबावाला बळी न पडणारा स्वतंत्र राजकीय विचाराचा पक्ष आहे. सध्या देशात ४ राज्यात पक्ष बळकट झाला असून, १७ राज्यात पक्ष संघटना प्रयत्नशील आहे. पक्षानं दलित, भटक्या विमुक्त व बहुजन समाजाला बरोबर घेऊन चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी केवळ ४० लोक सोबत होते, आता इथं सुमारे ४ लाख लोक एकत्र येतात.
यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील, डॉ. प्रल्हाद पाटील, सुनिता किरवे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विनायक रुपनवर, पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल सातकर, माजी जिल्हाध्यक्ष तानाजी शिंगाडे, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचं पत्र महादेव जानकर यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे २७ जुलै ते २४ ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यात 'युवा जोडो अभियान' होणार आहे. त्याची सुरुवात पुणे जिल्ह्यापासून झाली असून, पहिल्या टप्प्याचा शेवट २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर इथं होणार आहे. दुसरा टप्पा १ सप्टेंबरपासून सिंधुदुर्ग इथून सुरु होऊन ६ सप्टेंबर रोजी मुंबई इथं संपणार आहे, अशी माहिती रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.