Pimpri : भाजप पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी शंकर पांडुरंग जगताप यांची निवड करण्यात आली आहे. शंकर जगताप यांनी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर नेतृत्वाची धुरा शंकर जगताप यांच्याकडे सोपवली आहे.
मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यामुळे राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमामुळे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली होती.भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यानंतर पक्षातील सर्वच पदांवर नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर आता शहराध्यक्ष, जिल्हाअध्यक्षांच्या नियुक्या करण्यात आल्या आहेत.बावनकुळेंनी राज्यातील शहराध्यक्ष, जिल्ह्याध्यक्षांची यादी जाहीर केली आहे.
शंकर जगताप यांनी नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. ते पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. त्यामुळे आता त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीला अच्छे दिन आले आहेत. चिंचवड मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शहरातील भाजपचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या संधीचे सोने करत दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणून दाखवली. त्यांनी स्पष्ट बहुमतासह महापालिकेत भाजपचे कमळ फुलवले होते.
शहराध्यक्ष, जिल्ह्याध्यक्षांची नियुक्ती करताना भाजपने काही निकष निश्चित केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने खासदार, आमदार पदावर असलेल्यांना, तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या इच्छुकांना आणि विद्यमान अध्यक्ष यापैकी कोणाचीही निवड न करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
अध्यक्षपदासाठी कोण सक्षम आहे, याची चाचपणी मे महिन्यात प्रभारींकडून करण्यात आली होती. शहरातील विधानसभा अध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुखांबरोबर त्यादृष्टीने चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार नावे निश्चित केली होती. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्षाची निवड केली असल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.