Maharashtra Politics : पवारांच्या 25 वर्षांच्या सत्तेला धक्का, भाजपचा दणदणीत शिरकाव; अंकुश आहेर अध्यक्षपदी!

Sharad Pawar NCP Ankush Aher Market Committee : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघावर शरद पवार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, या संघाच्या अध्यक्षपदी भाजपकडे आले आहे.
Maharashtra State Market Committee Federation Politics
Maharashtra State Market Committee Federation Politicssarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : गेल्या पंचवीस वर्षांपासून राष्ट्रवादी नेते शरद पवार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघावर अखेर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे.

संघाच्या सभापतिपदी भाजपचे संचालक आणि हिंगोलीचे अंकुश आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांच्या राजकारणात प्रथमच भाजपला नेतृत्वाची संधी मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीर्घ वर्चस्वाला छेद मिळाल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे.

पुण्यातील मार्केट यार्ड येथील संघाच्या मुख्यालयात पुणे विभागीय उपनिबंधक मोहन निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतिपदासाठी आहेर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

संघाचे यापूर्वीचे सभापती प्रवीणकुमार तथा बाळासाहेब नाहाटा यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच सभापतिपद मिळविले.

राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाला महत्त्व आहे. गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ या संस्थेवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. त्यामुळे या संस्थेच्या सभापतिपदी भाजपच्या संचालकाची झालेली निवड केवळ पदापुरती मर्यादित नसून, सहकार क्षेत्रातील बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत देणारी मानली जात आहे.

Maharashtra State Market Committee Federation Politics
Sharad Pawar Pune Graduate Election : सस्पेन्स संपला! शरद पवारांचा हर्षदा देशमुख-जाधवांवर विश्वास, उमेदवारीसाठी भैय्या मानेंची चर्चा पण…

पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; भाजपला संधी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. बाजार समिती संघाच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील विविध गटांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही फोनवरून काही संचालकांशी संपर्क साधल्याची चर्चा होती. मात्र, विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही संचालकांनी आहेर यांना पाठिंबा दिल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला.

१२ वर्षांच्या अनुभवाचा फायदा

अंकुश आहेर हे हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार येथील बाजार समितीचे माजी सभापती असून, त्यांना बाजार समितीच्या कामकाजाचा सुमारे १२ वर्षांचा अनुभव आहे. संघाच्या सभापतिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर बाजार समित्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, त्यांच्या बळकटीकरणासाठी नवीन योजना आणणे आणि संचालक मंडळाच्या माध्यमातून बाजार समित्यांचे प्रश्न सोडविणे यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारचे राजकारण बदलणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विश्वास दाखविल्यामुळे सभापतिपदाची संधी मिळाल्याचे आहेर यांनी स्पष्ट केले.

एकूणच, राज्यातील बाजार समित्यांच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव राखणाऱ्या पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिळविलेली ही सत्ता महत्त्वाची मानली जात आहे. सहकार क्षेत्रातील या बदलाचा आगामी काळात बाजार समित्यांच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra State Market Committee Federation Politics
NCP SP : पवारांच्या राष्ट्रवादीने अवघ्या 8 महिन्यांत भाकरी फिरवली; पाणीदार नेत्याला हटवून अनुभवी पुढाऱ्याकडे सोपवली सूत्रे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com