
पुणे : बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे आवतन आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना दिले आहे. त्यामुळं आता कोल्हे हे आवतन स्वीकारणार का, यावरून जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
जुन्नर (Junnar) तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना आढळराव यांनी हे वक्तव्य केलं आहे. डिसेंबर २०२१च्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विविध अटी व शर्ती घालत बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत आढळराव आणि कोल्हे यांच्यात द्वंद्व सुरु असते. यापार्श्वभुमिवर आढळराव यांनी कोल्हे यांना उपरोधिक आवतन दिले आहे.
आढळराव यांच्या लांडेवाडी गावात शुक्रवार (ता.11) आणि शनिवार (ता.12) या सलग दोन दिवस बैलगाडा शर्यती होणार आहेत. या शर्यतींच्या आवतनाला खासदार कोल्हे कशाप्रकारे प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोल्हे यांचे नाव न घेता आढळराव यांनी त्यांच्यावर टीका केली. लोकसभेच्या निवडणुका होऊन आता तीन वर्षे झालीत. मात्र कोणतेही ठोस काम करण्यात अपयश आले आहे. मी मंजुर केलेली कामेच सध्या सुरु असून. त्याचे श्रेय घेण्याचे काम सध्या करत आहेत, असं आढळराव म्हणाले.
पुणे-नाशिक महामार्गावरील सर्व पाच बायपाससाठी मी खासदार असताना लोकसभेत केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारुन निधीची मागणी केली होती. त्यांनी तातडीने या कामांना निधी देत लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच कामे सुरु केली, त्याचे श्रेय विद्यमान घेत असल्याचा टोला आढळराव यांनी लगावला. आदिवासी समाजाच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या हिरडा प्रक्रिया उद्योगाबाबत बोलतानाही आढळराव यांनी टीका केली.
आढळराव म्हणाले, मी आणि शरद सोनवणे यांनी प्रयत्न करुन दहा कोटींचा निधी प्रकल्पासाठी आणला. मात्र याचे श्रेय आम्हाला मिळु नये यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी आयुक्तांना वेठीस धरत आहेत. माजी आमदार-खासदारांना बैठकांना का बोलविता, अशी विचारणा करतात. कारखाना सुरुच होऊ नये तो सुरु होण्याअगोदरच बंद पडावा याप्रकारे गलिच्छ राजकारण केले जात आहे, असं टीकास्त्र आढळराव यांनी सोडलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.