

Pune News : विधानपरिषदेच्या माजी उपसभापती व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी शनिवारी (ता.26) पहाटेच्या सुमारास घुसखोरी झाल्याने लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हातोडा, पकड, हातमोजे आणि सुमारे दहा मीटर लांबीची दोरी घेऊन आलेल्या तरुणाला सुरक्षारक्षक आणि ड्युटीवरील पोलिसांनी ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, नीलम गोऱ्हे या तरुणाने घराच्या पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही बंद केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे हा तरुण नेमका कोणत्या उद्देशाने गोऱ्हे यांच्या निवासस्थानी आला होता, याचा पोलिसांनी सखोल तपास करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.
विधानपरिषद आमदार व शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास संबंधित तरुणानं प्रवेश केल्याचं दिसून आलं. त्यानंतर संबंधित तरुणाला सकाळी सातच्या सुमारास बंगल्याचा सुरक्षारक्षक आणि ड्युटीवरील पोलिसानं पकडलं. त्याच्या बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि दोरी आढळून आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या तरुणाने आपण विद्यार्थी असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
पहाटेच्या वेळी लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी प्रवेश करण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता? बंगल्याच्या गच्चीवर जाण्याची आणि पाण्याच्या टाकीचे कनेक्शन बंद करण्याची गरज त्याला का भासली? त्याच्याकडील साहित्याचा वापर कशासाठी केला जाणार होता? त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे कशी आली? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.
घटनेच्या वेळी डॉ. गोऱ्हे या निवासस्थानी नव्हत्या. मात्र, त्यांच्या निवासस्थानी अशा प्रकारे प्रवेश होणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तरुणाला सोडण्यासाठी राजकीय व्यक्तींकडून दबाव आणला जात असल्याची माहिती मिळाल्याचा दावा पुढे येत आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनी देखील हा दावा नाकारला आहे.
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी झालेली ही घुसखोरी चोरीच्या उद्देशाने होती की त्यामागे आणखी काही कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हातोडा, पकड आणि दोरीसारखे साहित्य सोबत असणे, तसेच घराच्या पाण्याच्या टाकीचे कनेक्शन बंद केल्याचा उल्लेख असणे, यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.