

Pune News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील संभाव्य एकीबाबत काही दिवसांपूर्वी राजकीय चर्चा सुरू होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्यासाठी बैठकही झाली होती. मात्र, या बैठकीत नेमकं काय बोलणं झालं? एकत्र येण्याचा प्रस्ताव कुणी मांडला? आणि त्यानंतर एकी का होऊ शकली नाही? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे.
जय पवार यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी सुप्रिया आत्यांच्या घरी बहिण रेवतीला भेटण्यासाठी गेलो असताना सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत एकत्र येण्याची चर्चा झाली होती. विशेष म्हणजे युगेंद्र पवार यांनीच सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का, असा प्रस्ताव मांडला होता, असा दावा जय पवार यांनी केला.
या चर्चेदरम्यान पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा मुद्दा स्पष्ट केला. “युगेंद्र, आमचे कार्यकर्ते आम्हाला असं करू नका, असं सांगत आहेत. हे कार्यकर्ते आमच्यासाठी झटतात, त्यामुळे आम्हाला त्यांचं ऐकावं लागतं,” अशी भूमिका पार्थदादांनी मांडल्याचे जय पवार यांनी सांगितले.
म्हणजेच, सोमेश्वरमध्ये पवार कुटुंबातील सर्व गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची शक्यता चर्चेत आली होती; मात्र कार्यकर्त्यांचा विरोध आणि स्थानिक राजकीय समीकरणांमुळे ही संभाव्य एकी प्रत्यक्षात आली नाही, असा या जय पवार यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.
जय पवार यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबतही भावनिक भूमिका मांडली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकारण सोडून आईला वेळ देण्याचा विचार मनात आला होता, असे त्यांनी सांगितले.
“दादांचा अपघात झाला, त्यावेळी त्यांच्याजवळ जनतेच्या कामांचीच कागदपत्रं होती. शेवटच्या क्षणापर्यंत ते जनतेसाठीच काम करत होते. दादा गेल्यानंतर राजकारण सोडावं, आईला वेळ द्यावा, असंही मनात आलं होतं. मात्र, त्या १३ दिवसांत दादांवर जनतेचं किती प्रेम आहे, हे आम्ही पाहिलं. त्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठीच काम करण्याचा निर्णय घेतला,” असे जय पवार म्हणाले.
“आपण दादांचे वारस आहोत. त्यांचं रक्त आपल्या शरीरात आहे. जनतेसाठी जगायचं आणि दादांनी आयुष्यभर जपलेला जनसेवेचा विचार पुढे न्यायचा,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीवरून युगेंद्र पवार यांनी केलेल्या आरोपांवरही जय पवार यांनी पलटवार केला.
माळेगाव कारखान्याला ७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, आपण या विषयाची माहिती घेतली असता कारखाना दोन कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याची माहिती समोर आल्याचे जय पवार यांनी सांगितले. निवडणूक लढवायची असेल तर जरूर लढवा; पण वस्तुस्थितीच्या आधारावर लढा. उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवू नका. सभासद आणि शेतकरी सुज्ञ आहेत. त्यांना काय खरं आणि काय खोटं हे चांगलं कळतं. सत्य फार काळ लपवता येत नाही असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.