

Pune News : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार की हा पक्ष थेट सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होणार, याबाबत जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत सहभागी होण्याबाबत दोन स्पष्ट मतप्रवाह असल्याचे बोलले जात आहे.
पक्षातील एका गटाची इच्छा सत्ताधारी बाकावर बसण्याची आहे, तर दुसरा गट विरोधी पक्षातच राहण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली आणि काय निर्णय झाला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व चर्चांवर बारामती दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे यांनी या कथित बैठकीवर थेट भाष्य करणे टाळले, मात्र दिल्लीतील भाजप नेत्यांसोबतच्या नियमित भेटींचा दाखला दिला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची कोणतीही बैठक झाली आहे की नाही, याबद्दल मला काहीही माहिती नाही. हे मला तुमच्याकडून म्हणजेच पत्रकारांकडूनच समजत आहे. परंतु, विनोद तावडे आणि माझी अनेकदा भेट होत असते.
आम्ही दोघेही 'जॉइंट पार्लमेंटरी कमिटी ऑन कॉर्पोरेट अफेअर्स'मध्ये एकत्र आहोत. या कमिटीच्या बैठकांमुळे गेल्या महिनाभरात आमची किमान २० वेळा भेट झाली आहे. अगदी मागील आठवड्यातही बैठकीनिमित्त आम्ही दोनदा भेटलो आहोत. फक्त विनोद तावडेच नव्हे, तर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्याशीही माझी सातत्याने भेट होत असते," असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी तावडे आणि पाटील यांच्या भेटीबाबत कोणती माहिती नसल्याचे स्पष्ट करत या बैठकीवर अधिक बोलणं टाळलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.