Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांचा आज 83 वा वाढदिवस. यानिमित्ताने राष्ट्रवादीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लेक, खासदार सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमावर खास पोस्ट शेअर करीत बाप-लेकीचं हळुवार नातं उलगडलं आहे. सुप्रियाताईंची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
"संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे!" असा निर्धार सुप्रियाताईंनी व्यक्त केला आहे. "जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
आपल्या बाबांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया यांनी खास पोस्ट शेअर केली. या पोस्टसोबत त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे टिपलेला स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरचा पवारांचा हा पहिलाच वाढदिवस. वाढदिवासनिमित्त पवारांना दोन्ही गटातील नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धनंजय मुंडे, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिकांसह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.
मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.
कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.
मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.
संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.
लढेंगे-जितेंगे !!
बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.