Pune News: राज्यभरातील शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासही वेगाने सुरू झाला आहे. मात्र, याच दरम्यान 'बालभारती'च्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून या नव्या पाठ्यपुस्तकांनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यासही सुरू झाला आहे. मात्र, असं असतानाच चौथीच्या गणिताच्या नवीन पाठ्यपुस्तकात एक-दोन नव्हे, तर अनेक गंभीर चुका आढळल्या आहेत.
विशेष म्हणजे, मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या पुस्तकांमध्ये हा घोळ झाला असून, शाळा सुरू झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आल्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत आहे.
गणिताचे धडे देणाऱ्या बालभारतीने थेट थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीखच बदलण्याचा अक्षम्य पराक्रम केला आहे. गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे निधन २६ एप्रिल १९२० रोजी झाले होते, मात्र नवीन पाठ्यपुस्तकात त्यांच्या निधनाची तारीख २७ एप्रिल १९२० अशी चुकीची छापण्यात आली आहे. केवळ इतिहासच नव्हे, तर गणिताच्या मूळ संकल्पना, लांबी-वजन आणि भागाकार या पाठातील आकड्यांमध्येही मोठी गडबड करण्यात आली आहे.
गणिताच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक ५५ वर ‘स्वाध्याय’ शीर्षकाखाली ‘ब गटा’त सहावा आकडा ‘१००० ग्रॅमपेक्षा जास्त’ असा पर्याय दिला आहे, जो पूर्णपणे चुकीचा असून त्याऐवजी ‘१००० किलोग्रॅमपेक्षा जास्त’ असा पर्याय हवा होता.
हाच गोंधळ इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातही पाहायला मिळत असून पान क्रमांक ७७ वर शेवटून पाचव्या ओळीत ‘रुपये १.४०+९ = ४९’ असे छापले आहे. मुळात, हे गणित ‘४०+९ = ४९’ असे असायला हवे होते. अशा गंभीर चुकांमुळे बालभारतीचे 'बिनचूक' पाठ्यपुस्तकांचे गणित पुरते बिघडले असून, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मांडला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
या संपूर्ण प्रकरणावर बालभारती ने "हा प्रकार प्रिंटिंग मिस्टेक असावा, आम्ही संबंधित कमिटीची बैठक बोलवली आहे," असे उत्तर देऊन चुकांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता शाळा सुरू झालेल्या असताना गणिताच्या पुस्तकात आढळलेल्या या मोठ्या चुकांवर बालभारती नक्की काय स्पष्टीकरण देणार आणि यात कशी सुधारणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.