Pune : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात एका आठवड्यात सुनावणी घ्या आणि दोन आठवड्यानंतर काय कार्यवाही केली याची माहिती द्या, असे आदेश दिले आहेत. तसेच चार महिन्यात काहीच कारवाई न केल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या वेळकाढूपणावर खडे बोल सुनावले.
त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष कामाला लागले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या आगामी काळातील हालचालींकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. अशातच आता कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाटांना फटकारले आहे.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
राज्यातील सत्तासंघर्षानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील महत्त्वाची सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि वकील असीम सरोदे(Asim Sarode) हे बाजू मांडणार आहेत. याचवेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिल्ली दौऱ्यावर थेट भाष्य केले आहे.
अॅड. सरोदे म्हणाले, १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत त्यांचे हे बोलणे चुकीचे आहे, तटस्थपणे कुणीही वागत नाही, हे त्याचे उदाहरण आहे.
सरोदे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर दिल्लीला कशासाठी गेले आहेत, याचे कारण खुद्द त्यांनी सांगितले आहे. असे असताना शिरसाट यांचे वक्तव्य आश्चर्यकारक म्हणावे लागेल. विधानसभेच्या अध्यक्षांची बाजू मांडण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला, हा प्रश्न येथे उपस्थित होतो.
सरोदे नेमकं काय म्हणाले...?
अॅड. सरोदे यांनी शिंदे गटातील या लोकांसाठी संविधानिक मूल्ये, दहाव्या परिशिष्टाचा उद्देश काय आहे, हे महत्वाचे नाही. १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना ज्यांचा सल्ला घ्यायचा आहे, ते घेऊ शकतात. मात्र ते सांगण्याचा, विधानसभा अध्यक्षांची वकिली करण्याचा त्यांचा काहीही संबंध नाही. कुणीही तटस्थपणे वागत नाही, हे स्पष्ट करणारे हे उदाहरण आहे, असेही अॅड. सरोदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.
संजय शिरसाटांचं ते वक्तव्य काय...?
विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकर सुनावणी करावी, यासाठी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. अॅड. नार्वेकर हे गुरुवारी दिल्ल्लीला रवाना झाले.
यासंदर्भात संजय शिरसाट(Sanjay Shirsat) म्हणाले होते, नार्वेकर हे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. आमचे दिल्लीतील वकील जे मार्गदर्शन करतील, त्यानुसार कारवाई केली जाईल. यापूर्वी त्यांनी दोन आठवड्यांचा वेळ दिला होता. मात्र, आता घाई जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे आम्ही पालन करू, जे काही आदेश आम्हाला देण्यात येतील किंवा जी काही भूमिका आम्हाला मांडायची असेल ती आम्ही योग्य पद्धतीने मांडू.
नार्वेकरांचं स्पष्टीकरण...
दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना अध्यक्ष नार्वेकर यांनी मात्र १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा संदर्भ दिला नाही. दिल्लीचा हा माझा पूर्वनियोजित दौरा आहे. अनेक कार्यक्रम आणि बैठका असून, त्यात मला सहभागी व्हायचे आहे, त्यामुळे मी दिल्लीला निघालो आहे, असे स्पष्टीकरण ॲड. नार्वेकर यांनी दिले आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.