Ajit Pawar : अवघड वाटणारी ‘माळेगाव’ची निवडणूक अजितदादांच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे फिरली!

Malegaon Sugar Factory Election Result 2025 : राष्ट्रवादी काँग्रेसला ‘माळेगाव’ची निवडणूक या वेळी थोडी कठीण जाणार, असे फिडबॅक येत होते, त्यामुळे पवारांनी ‘माळेगाव’ची निवडणूक लढविण्याचा मोठा डाव खेळला, ते तेवढ्यावरच न थांबता थेट आपणच चेअरमन होणार, असेही जाहीर केले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati, 26 June : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीळकंठेश्वर पॅनेलने माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 20-01ने अगदी एकतर्फी जिंकली. अजितदादांच्या झंझावतापुढे विरोधकांचे संख्याबळ कधी नव्हे; ते एकवर आले आहे. यामागे अजित पवारांचा ‘माळेगाव’ची निवडणूक लढविण्याचा निर्णय ‘की पॉईंट’ ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ‘माळेगाव’ची निवडणूक या वेळी थोडी कठीण जाणार, असे फिडबॅक येत होते, त्यामुळे पवारांनी ‘माळेगाव’ची निवडणूक लढविण्याचा मोठा डाव खेळला, ते तेवढ्यावरच न थांबता थेट आपणच चेअरमन होणार, असेही जाहीर केले. विरोधकांना अनपेक्षित असणाऱ्या या ‘गुगली’मुळे अजितदादांनी ‘माळेगाव’ची अर्धी लढाई जिंकली होती. उर्वरीत काम त्यांनी आठवडाभर बारामतीत थांबून फत्ते केले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील नीळकंठेश्वर पॅनेलने 20 जागा जिंकल्या आहेत. विरोधी गटातील चंद्रराव तावरे हे एकमेव जिंकले आहेत. अजित पवार नावाच्या वादळात विरोधकांचा सुफडा साफ झाला आहे. मात्र, या निवडणुकीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि खुद्द अजित पवार यांचे मोठे कष्ट आहे.

माळेगाव कारखान्याची निवडणूक (Malegaon Sugar factory election) जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निगेटिव्ह रिपोर्ट येत होते. पक्षाला काही यंत्रणाबाबत सभासदांच्या कलाबाबत चाचपणी करण्यात येत होती. त्याचे रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिकूल असे होते, त्याला कारणेही विविध आहेत. माळेगाव कारखान्याच्या संचालकांमध्ये असणारे मतभेद, ज्येष्ठ नेत्यांमध्ये असणारा विसंवाद, महत्वकांक्षा तसेच, पाच वर्षांची सत्ता यामुळे राष्ट्रवादीला ही निवडणूक कठीण जाणार, असेच संकेत मिळत होते.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने माळेगाव कारखाना ताब्यात असणे महत्वाचे ठरते. ‘माळेगाव’चे सुमारे 20 हजार सभासद म्हणजे लाखभर लोकांशी थेट कनेक्ट असणारा हा कारखाना आहे. बारामतीची बहुतांश बाजारपेठ ही ‘माळेगाव’च्या उलाढालीवर अवलंबून आहे. या निवडणुकीच्या निकालाचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणार होता, त्यातूनच अजित पवारांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

अजित पवार यांच्या निवडणूक लढविण्याच्या एकाच निर्णयामुळे ‘माळेगाव’ची निवडणूक फिरल्याचे बारामतीतील जाणकार सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसला अवघड वाटणारी सोपी झाली. त्यानंतरही अजित पवार यांनी विरोधकांना हलक्यात न घेता तब्बल आठवडाभर बारामतीत मुक्काम ठोकला. प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन सभासदांशी संवाद साधला. अगदी विरोधकांच्या अगदी जवळच्या लोकांना आपले करण्यात अजित पवारांना यश आले. अजितदादांनी केवळ माळेगाव कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता आगामी निवडणुकांची बांधणीच त्यांनी केली.

Ajit Pawar
Mohol Politics : उमेश पाटलांनी राजन पाटलांना पुन्हा डिवचले; ‘अदखलपात्र कुटुंब’ म्हणत केली टीका

माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील माळेगाव, सांगवी आणि पणदरे हा तावरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या बालेकिल्ल्यातसुद्धा अजित पवार यांच्या पॅनेलच उमेदवार आघाडीवर होते, त्यावरूनच त्यांनी किती जोरदार मोर्चेबांधणी केली होती, हे लक्षात येते. अजित पवार स्वतः या निवडणुकीत उतरले नसते तर राष्ट्रवादीला ही निवडणूक जड गेली असती. कारण समोर सहकारी मातब्बर नेते होते. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनीही जोरदार तयारी केली होती, ते ओळखूनच अजितदादांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक फिरवून दाखवली.

अजित पवार यांचे वादळ इतक मोठे होते की आतापर्यंतच्या निवडणुकीत विरोधकांच्या चार ते पाच जागा कायम निवडून यायच्या. रंजन तावरे यांच्यासारख्या लढवय्या नेत्यालाही पराभूत व्हावे लागले. माजी उपाध्यक्षांना पराभावाचे तोंड पाहावे लागले. एकट्या अजित पवारांनी ही निवडणूक फिरवली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

...तो आरोपही पुसायचा होता

अजित पवार यांना सहकारी कारखानदारी मोडीत काढायची आहे, असा आरोप त्यांच्यावर कायम होतो. माळेगावच्या निवडणुकीत तर विरोधकांच्या प्रचाराचा तो मुख्य मुद्दा होता. मात्र, सहकारी साखर कारखानाही मी चांगल्या पद्धतीने चालवू शकतो. सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा विश्वास माझ्यावर आहे, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, असेही अजित पवार यांनी प्रचाराच्या काळात सांगितले.

Ajit Pawar
Chandrarao Taware : अजितदादा नावाच्या वादळातही 85 वर्षांच्या योद्धाने रोवला विजयाचा झेंडा!

पैशाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘लक्ष्मीदर्शना’चा मुद्दा गाजला. विरोधकांनी अजित पवार यांच्यावर पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकली असा आरोप केला आहे. तसेच, निवडणूक काळात बारामती शहरातील अमराई भागात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची शाखा रात्री साडेअकरापर्यंत सुरू होती, त्या ठिकाणी माळेगाच्या सभासदांच्या यादी होती, असा आरोप विरोधकांनी केला आहे, तोही विचार करायला लावणारा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com