
Baramati, 25 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत 21 जागांपैकी 17 जागांचे निकाल जाहीर झाले असून सोळा जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार विजयी झाली आहेत. उर्वरीत एक जागेवर विरोधी सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख नेते तथा माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे विजयी झाले आहेत. अजितदादा नावाच्या सर्वार्थाने शक्तीशाली असलेल्या वादळातही 85 वर्षांच्या योद्धाने आपल्या विजयाचा झेंडा रोवत आपले नाणे अजूनही खणखणीत असल्याचे दाखवून दिले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नावालाच चार पॅनेल होते. मात्र, खरी लढत ही अजित पवार आणि चंद्रराव तावरे (Chandrrao Taware ) यांच्या पॅनेलमध्येच झाली. प्रचाराच्या रणधुमाळीतही अजितदादा विरुद्ध चंद्ररावअण्णा असाच सामना रंगला होता. दोघेही एकमेकांवर तुटून पडले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात शाब्दीक वार केले होते. त्याला चंद्रराव तावरे यांनी संयमाने पण तेवढ्याच धारदार शब्दांनी अजित पवारांना उत्तर दिले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे प्रथमच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरले होते. तसेच त्यांनी आपण माळेगावचे पाच वर्षे चेअरमन होणार, हे जाहीर करत एक डाव टाकला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला जड जाणारी निवडणूक अजितदादांनी निम्मी जिंकली होती. केवळ माझ्याकडे पाहून मतदान करा; माळेगावचा कारभार मीच पाहणार आहे, असे आवाहन त्यांनी सभासदांना केले. विरोधकांपेक्षा अजितदादांचा चेहरा सभासदांना अधिक आश्वासक वाटला, त्यामुळे मतदारांनी अजितदादांच्या पॅनेलला कधी नव्हे असा एकतर्फी विजय मिळवून दिला.
मागील काही निवडणुकांमध्ये विरोधी पॅनेलला चार ते सातच्या दरम्यान जागा मिळत होत्या. या वेळी मात्र अजित पवार यांच्या झंझावातापुढे विरोधी पॅनेल भूईसपाट झाल्याचे दिसून येत आहे. कारण या निवडणुकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, इतर वरिष्ठ नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पण, या निवडणुकीत 85 वर्षांचे चंद्ररावअण्णा मात्र घट्ट पाय रोवून उभे राहिले.
राज्यात सत्तेवर असलेले सर्वाधिक पॉवरबाज अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांना ते नडले. संयमाने ते किल्ला लढवत राहिले. राज्यातील सत्ता, प्रशासन, सर्व आर्थिक नाड्या हाती, कारखान्याची सत्ता ही सर्व यंत्रणा ताब्यात असूनही तावरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवले होते. त्यात त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला असला तरी ते स्वतः मात्र निवडून आले आहेत.
सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख उमदेवार चंद्रराव तावरे सांगवी गटातून विजयी झाले आहेत. सांगवी गटातून चंद्रराव तावरे हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांना 8163 मते मिळाली आहेत. सत्ताधारी नीळकंठेश्वर पॅनेलचे गणपत खलाटे हे 8543, तर विजय तावरे हे 7882 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यामुळे सांगवीतून चंद्ररावअण्णा तावरेंनी आपला गड राखला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.