लोकसभा निवडणुकीचा आखाडा मारल्यानंतर विरोधी बाकांवरील ठाकरे-पवारसाहेब-काँग्रेस विधानसभेत सत्ताधारी शिंदे-फडणवीस-अजितदादांना चितपट करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आतापासून 288 मतदारसंघाची बांधणी आणि उमेदवार देण्याच्यादृष्टीनं महाविकास आघाडीनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यात शरद पवारसाहेब ( Sharad Pawar ), उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून हायकमांडनं लक्ष घातलं आहे.
पुण्यातील भाजपचे ( Bjp ) वर्चस्व मोडण्यासाठी पवारसाहेबांनी लक्ष घातल्याचं शनिवारी स्पष्ट झालं. पुण्यातील जागावाटप निश्चित झाले नसले, तरी याआधी कुठे वर्चस्व होते, त्या मतदारसंघातील इच्छुकांसोबत चर्चा करून कुठे-कसा डाव टाकायचा आणि भाजपला कसे पराभूत करायचं, याचा अंदाज बांधला. ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असलेल्या आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारलेल्या हडपसर आणि राष्ट्रवादीतून फुटून अजितदादांकडे गेलेल्या चेतन तुपेंना धडा शिकवण्यासाठी शरद पवारसाहेब ( Sharad Pawar ) शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना बळ देण्याची शक्यता आहे.
हडपसरबाबत पवारसाहेब 'पॉझिटिव्ह' असल्याचं सांगून बाबर यांनी आपण कसे उजवे आहोत, हे पटवून सांगत विधानसभा लढायला तयार आहे, लढणार आणि जिंकणार, असा विश्वास शरद पवारसाहेबांपुढे मांडला. मात्र, लोकसभा निवडणुकीत सगळे गणित बिघडल्यानंतर विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या वसंत मोरे सुद्धा याच मतदारसंघातून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वसंत मोरे यांचे काय होईल, याची वाट न पाहताच बाबर यांनी शनिवारी सकाळीच मोदीबाग गाठून शरद पवारसाहेबांची भेट घेतली. आणि हडपसर मतदारसंघ शिवसेनेकडे असावा, तिथे मीच सक्षम असल्याचं पटवून सांगितलं.
परिणामी बाबर ठाकरेंऐवजी पवारसाहेबांना भेटल्यानं वेगळ्या चर्चेला तोंड फुटलं आहे. म्हणजे हडपसरची जागा शिवसेनेकडून शरद पवारसाहेबांच्या पक्षाकडे गेल्यास महादेब बाबर राष्ट्रवादीकडून लढणार नाहीत ना? असा प्रश्न यानिमित्तानं पुढं येत आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत बाबर यांनी हडपसरमध्ये आपली ताकद दाखवून आमदारकी घेतली होती. आमदार चेतन तुपे यांचं बंड महादेव बाबर यांची पुन्हा लढण्याची तयारी, प्रशांत जगताप यांचा प्रचार आणि वसंतात्यांची शिवसेनेतील 'एन्ट्री' हडपसरचा गोंधळ वाढणार हे नक्की.
महादेव बाबर हे ठाकरेंचे निष्ठांवत शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते ठाकरेंसोबत राहिले. पुण्यातील जुने शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. महापालिकेत सेनेचा नगरसेवक आणि ताकत नसतानाही उपमहापौरपद स्वत:कडे आणले होते. तेव्हा, माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्याशी शिवसेनेचा घरोबा होता. आमदार असताना बाबर यांनी कोंढवा परिसरात शिवसेनेचे काही नगरसेवक निवडून आणले. आजूबाजूच्या परिसरात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, 2014 च्या निवडणुकीत बाबर यांचा घात झाला. भाजपच्या योगेश टिळेकर यांनी बाबर यांचा पराभव केला. या पराभवानंतर बाबर यांनी नशिब आजमावलं होतं. पण, फारसा फायदा झाला नाही. 2019 च्या निवडणुकीत वसंत मोरे यांच्या उमेदवारीमुळे चेतन तुपे आमदार झाले. यानंतर महादेव बाबर लढणार नाहीत, असं बोलले गेले. पण, लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी वरचढ राहिल्यानं बाबर यांचा 'कॉन्फिडन्स' वाढला आहे. हडपसरमधील अनेक सर्व्हेत आपली सरशी असल्याची दाखवून बाबर यांनी पवारसाहेबांकडे हा मतदारसंघात आपल्यासाठी अनुकूल आहे, हे सांगितलं.
दरम्यान, आघाडीत हा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे आहे. आमदार चेतन तुपे यांनी अजितदादांना साथ दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अप्रत्यक्षपणे हडपसरमधून विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले होते. त्यातच महादेव बाबर यांनी शरद पवारसाहेबांची भेट हडपसरमधून लढण्यास इच्छुक असल्याचं सांगून प्रशांत जगताप यांची अडचण निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.