

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक 38 मध्ये अतिशय इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळत आहे. या प्रभागातून 5 नगरसेवक निवडून जाणारा असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये अटीतटीची, तिरंगी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक 38 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वसंत मोरे रिंगणात आहेत. मोरे यांना ही निवडणूक दोन पातळीवर लढावी लागत आहे. एकीकडे प्रभाग क्रमांक 38 मधून ते स्वतः उभे आहेत. तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 40 मधून त्यांचे पुत्र रुपेश मोरे हे रिंगणात आहेत.
याच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही दिग्गज नेते मैदानात आहेत. वसंत मोरे यांच्या विरोधात माजी नगरसेवक प्रकाश कदम यांना उतरवण्यात आलं असून त्यांच्यासोबत माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक युवराज बेलदार यांची पत्नी सीमा बेलदरे, स्मिता कोंढरे आणि सारिका फाटे हे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याचबरोबर वसंत मोरे यांचे पारंपारिक विरोधक असलेल्या बाबर यांच्या कुटुंबातून स्वराज बाबर यांनी देखील मोरे यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांना मोरे यांच्या विरोधात मैदानात उतरवला आहे.
तसेच या प्रभागामध्ये भाजप आमदार योगेश टिळेकर यांचं देखील वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं. योगेश टिळेकर आणि वसंत मोरे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे. या प्रभागातून भाजपने अश्विनी चिंदे, संदीप बेलदरे, राणी भोसले, प्रतिभा चोर्गे आणि व्यंकोजी खोपडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 38 अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रभागातील मतदार संमिश्र असल्याने कोणत्याही एका पक्षाचे एकहाती वर्चस्व नाही. वैयक्तिक लोकप्रियता, स्थानिक कामे आणि पक्षीय युती यावर निकाल अवलंबून राहील. मागील निवडणुकांमध्ये येथे राष्ट्रवादी आणि भाजपची चांगली ताकद होती, पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोरे यांना पक्षात घेऊन त्यांना तिथे तिकीट दिले आहे. हा त्यांचा पारंपारिक प्रभाग आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हान वाढले आहे.
प्रभाग क्रमांक 38 (बालाजीनगर-आंबेगाव पठार-कात्रज परिसर) हा पुणे महापालिकेतील सर्वात मोठा प्रभाग आहे, ज्यात सुमारे १.४८ लाख मतदार आहेत आणि येथून ५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. हा संमिश्र मतदारांचा प्रभाग असून, झोपडपट्टी, मध्यमवर्गीय सोसायट्या आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे.
या प्रभागात पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कात्रज-कोंढवा रोडवरील ट्रॅफिक जाम, उड्डाणपूल आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे प्रमुख मुद्दे आहेत. मागील काही वर्षांत कात्रज चौकातील रस्ते आणि विकासावरून वसंत मोरे आणि योगेश टिळेकर यांच्यात वारंवार संघर्ष झाला आहे, ज्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवरही केंद्रीत राहिल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.