

Pune News: गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा राजकारणाचा रंग अधिक गडद झाला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीत सुरुवातीला बिनविरोधाचे संकेत होते. त्यानंतर युगेंद्र पवारांच्या पॅनेलमुळे ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत रंगण्याची चर्चा सुरू झाली. मात्र, आता पुरंदरचे शिवसेना (शिंदे) आमदार विजय शिवतारे यांनी थेट मैदानात उतरत या समीकरणालाच धक्का दिला आहे.
विशेष म्हणजे, २१ जागांसाठी शिवतारेंनी तब्बल ४२ उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या मैदानात ‘४२ गड्यांना’ उतरवलं आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली असून, आता पवारांच्या दोन्ही गटांसमोर शिवतारेंचे आव्हान उभे ठाकले आहे.
सोमेश्वर कारखान्यावर सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पॅनेलविरोधात पवार कुटुंबातीलच दुसरे पॅनेल उभे राहण्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यात आता शिवतारे आणि भाजपचे नेते संजय जगताप यांच्या संभाव्य पॅनेलची भर पडल्याने कारखान्याच्या निवडणुकीचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याची भूमिका विजय शिवतारे यांनी स्पष्ट केली आहे. केवळ घोषणा न करता त्यांनी २१ जागांसाठी ४२ उमेदवारी अर्ज दाखल करून आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे शिवतारे नेमके किती उमेदवार मैदानात ठेवणार आणि कोणत्या जागांवर थेट पवार गटांना आव्हान देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून तब्बल ६०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी १५ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे अंतिम चित्र त्यानंतरच स्पष्ट होणार असले, तरी सध्याच्या घडामोडींनी निवडणुकीत चुरस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
११ ऑक्टोबरला मतदान, तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत पॅनेल बांधणी, उमेदवारांची माघार आणि पडद्यामागील राजकीय जुळवाजुळव यांना वेग येण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोमेश्वर कारखान्याची निवडणूक होत असल्याने या लढतीकडे केवळ सहकारी संस्थेची निवडणूक म्हणून पाहिले जात नाही. बारामतीच्या राजकारणात पवार कुटुंबातील संघर्षाची नवी दिशा ठरविणारी ही निवडणूक मानली जात आहे. त्यात शिवतारे आणि भाजपच्या संभाव्य पॅनेलमुळे मतविभाजनाचे गणित निर्माण होण्याची शक्यता आहे.
एकीकडे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेल, दुसरीकडे युगेंद्र पवार-रोहित पवारांची आघाडी आणि त्यात शिवतारेंची ‘४२ गड्यांची’ एन्ट्री यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत यंदा ऊसापेक्षा राजकारणाचीच मोळी मोठी होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. आता ३० सप्टेंबरनंतर कोण कोणासोबत राहते आणि कोणाचे किती उमेदवार प्रत्यक्ष मैदानात उतरतात, यावर सोमेश्वरच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.