

Pune News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रभर चर्चेत आहे. या हत्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाल्मीक कराड याचे नाव समोर येत आहे. सीआयडीने खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला ताब्यात घेतले असून त्याची पाळमुळे खणण्याचे काम सीआयडीकडून करण्यात येत आहे. यामध्ये रोज नवनवीन खुलासे होत असून वाल्मिक कराडची संबंधित असलेले वेगवेगळे कनेक्शन पोलिसांच्या हाती लागत आहेत.
खंडणीच्या माध्यमातून जमवलेल्या मायेमधून वाल्मिक कराडने अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती जमवली असल्याचा संशय सीआयडीला आहे. पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये वाल्मीक कराड याने दोन ऑफिसेस विकत घेतली असल्याचे बोलले जात आहे. ही ऑफिसेस वाल्मीक कराडची संबंधित असलेल्या महिलेच्या नावावर घेण्यात आली आहेत.
या ऑफिसच्या खरेदीमध्ये भाजपचे (BJP) माजी नगरसेवक दत्ता खाडे यांनी मध्यस्थी केली असल्याचा संशय सीआयडीला आहे. त्यामुळेच आज सीआयडीने दत्ता खाडे यांना बोलून तब्बल दोन तास चौकशी केली असल्याचं समोर आले आहे. दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी दत्ता खाडे यांच्या ऋणानुबंध होते. त्यासोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी ही खाडे यांची जवळीक होती.
त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून वाल्मिक कराड आणि खाडे यांची ओळख असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फार कालावधीपासून वाल्मिक आणि खाडे हे एकमेकाला ओळखत असल्याने यांच्यामध्ये अनेक आर्थिक व्यवहार झाले असल्याची शक्यता सीआयडीला वाटत आहे. वाल्मीक कराडचे खाडे हे पुणे कनेक्शन असू शकतात, अशी शक्यता सीआयडीला वाटत आहे. खाडे यांनी मात्र आपली वाल्मिक कराड याच्याशी तोंड ओळख असून आपले आणि त्याचे कोणतीही आर्थिक संबंध नसल्याचे सांगितले आहे.
कोण आहेत खाडे?
दत्ता खाडे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. 2007 ला दत्ता खाडे हे भाजपच्या तिकिटावर पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते 2012 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी देखील पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेविका होत्या. नुकत्याच झालेला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील दत्ता खाडे यांच्यावर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.