

- ब्रिजमोहन पाटील
BJP News : बिहारच्या बाकींपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मतदारसंघ. नितीन नवीन राज्यसभेवर गेले म्हणून इथे पोटनिवडणूक झाली. यात १९९५ पासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ हा जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांनी हिसकावून घेतला.
हा निकाल म्हणजे कसबा रिटर्न आहे. पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप १९९२ नंतर प्रथमच २०२३ मध्ये पराभूत झाला. दोन्ही निवडणुकांचा काळ, राज्य आणि राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी कसब्यातील पराभवाची जी कारणे चर्चिली जात होती, जवळपास हीच कारणे बाकींपूर विधानसभा मतदारसंघाच्या पराभवात दिसत आहेत.
भाजपचा बालेकिल्ला... पण कार्यकर्त्यांची नाराजी
भाजपचा बालेकिल्ला असला तरी लोकलचे भाजप कार्यकर्ते काम करत नाहीत. मतदान म्हणून ते आम्हाला गृहीत धरतात. ही तक्रार कसब्याच्या निवडणुकीत होती. हीच तक्रार आता बाकींपूरमध्ये होती.
भाजपचा उमेदवार काम करत नाही. ते आमच्या संपर्कात नसतात. ही तक्रार हेमंत रासनेबद्दल होती. याच्या उलट प्रतिमा रवींद्र धंगेकर यांची होती. त्यामुळे धंगेकरांनी भाजपचा बालेकिल्ला पोटनिवडणुकीत भेदला. त्यामुळे धंगेकर यांची महाराष्ट्रभर क्रेझ निर्माण झाली होती.
उमेदवाराविषयी असमाधान
बाकींपूरमध्ये भाजपने आधी बंटी सिन्हा यांना उमेदवारी दिली होती. पण ऐनवेळी नीरज सिन्हा यांना उमेदवारी दिली. त्यांचा मतदारांसोबत संपर्क नव्हता. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी होती. त्यापेक्षा तेथील मतदारांनी प्रशांत किशोर अशा राष्ट्रीय पातळीवरील नेत्याला भरभरून मतदान केले. प्रशांत किशोर यांना बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नाही, पण त्यांच्या या विजयाने त्यांचा पुढील रस्ता प्रशस्त झाला आहे.
कसबा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने उच्चवर्णीय मतदारांमध्ये नाराजी होती. त्यामुळे शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ येथील मतदार म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात बाहेर पडला नाही. भाजपला केवळ ब्राह्मणांची मते लागतात, उमेदवार चालत नाही ही नाराजी होती. या निवडणुकीत अनेक ब्राह्मण मतदारांनी धंगेकरांना मतदान केले होते.
अशीच नाराजी बाकींपूर पोटनिवडणुकीत दिसून आली. तेथील भरत तिवारी नावाच्या व्यक्तीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. तो ब्राह्मण होता. त्याच्या नाराजीमुळे भाजपच्या हक्काच्या उच्चवर्णीय मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली तसेच किशोर यांना मतदान केले.
वातावरण बदलणारे मुद्दे
कसबा पोटनिवडणुकीपूर्वी दोन्ही शिवसेनेत फूट पडली होती. त्याचा राग लोकांच्या मनात होता. ऐन निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिंदेंना देण्याचा निर्णय आला. त्याचा परिणाम कसबा पोटनिवडणुकीवर पडला होता. उद्धव ठाकरेंची शिवसेना धंगेकरांच्या बाजूने उतरली होती.
बिहारमध्ये तसा राजकीय पेच नव्हता. पण दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या जेन झी आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीत झाला. तरुणांच्या मनात भाजपविरोधी राग दिसत होता. त्यातून प्रशांत किशोर सारख्या चाणक्याला मतदान केले.
इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
कसब्याचा एक इतिहास आहे. भाजपचा आत्तापर्यंत कसब्यात केवळ पोटनिवडणुकीत पराभव झाला आहे. १९९२ ला वसंत थोरात यांनी गिरीश बापट यांचा पराभव केला होता. त्यानंतर सलग पाच निवडणुका बापट कसब्याचे आमदार होते, सहाव्या आमदार मुक्ता टिळक होत्या.
२०२३ ला झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या रासनेंचा मोठा पराभव केला आणि पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्याची पुनरावृत्ती केली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रासने यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि धंगेकर यांचा पराभव केला.
पण बाकींपूरमध्ये याच पद्धतीने पुढील निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा पराभव होईल असे मी म्हणणार नाही. तेव्हाची गणिते काय असतील हे मला माहिती नाही.
कसब्याची निवडणूक झाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात भाजपला पराभूत करता येऊ शकते असा संदेश गेला होता. विरोधकांच्या अंगावर मुठभर मास वाढले होते. पण त्यांना तो टेम्पो कायम ठेवता आला नाही हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवरून स्पष्ट झाले.
कसबा पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर काय झाले होते?
१. हेमंत रासने रस्त्यावर उतरून काम करू लागले
२. लोकांमध्ये मिसळू लागले, आधी बोलायचे टाळत होते. पण पराभवानंतर संवाद वाढला
३. नागरिकांची कामे करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली
४. सगळ्या जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम करू लागले
रासने त्यांच्यातील सुधारणा २०२४ च्या निवडणुकीत कामाला आली. आता हेच बांकीपूरमध्ये काय होते आपल्याला काय माहिती नाही. पण शेवटी एक सांगतो. बाकींपूरमधील विजयाने काँग्रेसने जास्त खूष व्हायचे कारण नाही, कारण त्यांच्या आघाडीचा माणूस तिसऱ्या नंबरवर गेला आहे. कसब्यात जे काँग्रेसला कमावता आले होते. ते बांकीपूरमध्ये कमावता आलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.