

Bihar News: गेली 30 वर्षे भाजपचा पारंपारिक मतदारसंघ राहिलेल्या बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जन सुराज पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर यांनी विजय खेचून आणला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा हक्काचा मतदारसंघ गमावण्याची वेळ भाजपवर ओढावली. या विजयानंतर जनसुराज पक्षासह विरोधकांच्या गोटात जल्लोषाचं वातावरण असलं तरी भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मात्र,याचवेळी लालू प्रसाद यादव यांच्या कन्या व आरजेडीच्या महिला नेत्यानं खळबळजनक विधान केलं आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या खासदार मीसा भारती यांनी एएनआयशी संवाद साधताना बांकीपूरमधील प्रशांत किशोर यांच्या विजयावरही मोठं भाष्य केलं आहे. या त्यांच्या दाव्यानं बिहारचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मीसा भारती यांनी प्रशांत किशोर जिंकत असतील म्हणजेच भाजप जिंकतंय असं धक्कादायक विधान करत बांकीपूर पोटनिवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
मीसा भारती म्हणाल्या, बांकीपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे, जिथं 35-40 वर्षांपासून काहीच काम झालेलं नाही. यात प्रशांत किशोर यांनी तेथील स्थानिक मुलांना पाटण्यातील खासगी शाळांमध्ये पाठवू, सरकारी शाळांमध्ये जाण्याची आवश्यकता असं म्हटलं आहे. पण प्रशांत किशोर यांनी बांकीपूरमधील मतदारांना खूप आश्वासनं दिली आहेत, जी पूर्ण होणं अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बांकीपूरममधील आश्वासनं कोणत्याही पार्टीचा आमदार, खासदार यांना पूर्ण करणं अवघड असल्याचंही मीसा भारती यांनी स्पष्टपणे म्हटलं. तसेच तेथील जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे खरे उमेदवार आहेत. जनतेला हे समजण्यासाठी वेळ लागेल,मात्र जेव्हा ते जिंकतील तेव्हा हे दिसून येईल असंही त्यांनी धक्कादायक दावा केला आहे.
भाजप उमेदवाराचा पराभव होत असला तरी तिथं प्रशांत किशोर जिंकत असतील तर तिथे भाजपचा विजय आहे. तिथं उमेदवार बदलण्यात आले, तेथे भाजपचं उमेदवार बदलण्याचं कारणच काय होतं? अशी विचारणाही राजदच्या खासदार मीसा भारती यांनी केली आहे.
प्रशांत किशोर यांच्यावर टीकेची झोड उठवताना खासदार मीसा भारती यांची जीभ घसरली. यावेळी त्यांनी प्रशांत किशोर हे भाजपचे लोमडी असल्याचं ठणकावलं आहे. त्या म्हणाल्या, भाजप म्हणत होते की, बांकीपूरमध्ये कुत्री मांजरं जरी उभी केली तरी ते विजयी होतील. म्हणून ते भाजपचे लोमडी आहेत. यावेळी मीसा भारतींनी बिहारची जनता, तरुणांना फसवलं जात असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
बिहार विधानसभेच्या बांकीपूर मतदारसंघात जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांनी भाजप उमेदवार नीरज कुमार यांचा तब्बल 18953 मतांनी दणदणीत पराभव केला. प्रशांत किशोर यांना या निवडणुकीत 63 हजार 203 तर नीरज कुमार यांना 44 हजार 250 मतं मिळाली. राजदच्या उमेदवार रेखा गुप्ता या पोटनिवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिल्या, त्यांना 14 हजार 085 मतं मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.