Beed Politics : अखेर राज्याच्या कृषी खात्याची धुरा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे. वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी (31 जुलै) रात्री उशीरा हा बदल जाहीर झाला.
या मंत्रीपदासाठी यापूर्वी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे हेही इच्छुक असल्याचे बोलले जात होते. त्यांनी बुधवारी आणि गुरुवारी सलग 2 दिवस मुंबईत तळ ठोकला होता. फडणवीस यांचीही त्यांनी दोनवेळा भेट घेतली होती. पण त्यांची डाळ शिजू शकलेली नाही, हे स्पष्ट झाले. खरंतर यामागे भाजप आमदार सुरेश धस यांचाच हात असल्याचे बोलले जाते.
धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याच्या चर्चांना सुरुवात होताच धस यांनी एन्ट्री घेतली आणि तिथूनच सगळा डाव फिरला.
डिसेंबर 2024 मध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकारण कमालीचे बदलले आहे. धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड याला या हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. मुंडे यांच्यावर कृषी मंत्री असतानाच्या काळातील घोटाळ्याचेही आरोप होते. पण नुकतीच न्यायालयातून त्यांना या घोटाळा प्रकरणात क्लिन चीट मिळाली. त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात जागा मिळेल अशी शक्यता होती.
खुद्द अजित पवार यांनीही धनंजय मुंडेंना यांनी पुन्हा संधी देण्याबद्दल संकेत दिले होते. अशात बुधवारी विधिमंडळाचा अहवाल आला, त्यात कोकाटे तब्बल 22 मिनिटे विधानभवनात रमी खेळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांचे खाते बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या. तेव्हाच धनंजय मुंडे हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेत होते. मुंडे यांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग करत असल्याचे बोलले गेले. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाची चर्चा सुरु झाली.
पण इथेच भाजपचे आमदार सुरेश धस यांची एन्ट्री झाली. त्यांनी बुधवारीच ज्या प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लिन चिट मिळाली आहे, त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार अशी घोषणा केली. शिवाय 169 कोटींच्या घोटाळ्याचे नवे आरोप केले. मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट घेतली. गुरुवारी ज्ञानेश्वरी मुंडे यांना फडणवीस यांच्या भेटीसाठी घेऊन गेले. तिथेही धस सोबत होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी मुंडेंवर गंभीर आरोप सुरू केले.
धनंजय मुंडे यांची परळीतील दहशत, महादेव मुंडे प्रकरणातील संशयाची सुई या सगळ्यांचा फोकस धनंजय मुंडे यांच्यावर राहील याची काळजी घेतली. शिवाय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचे विशेष मकोका न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे, याची आठवण करून दिली. धस यांच्या जोडीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुंडे विरोध पुन्हा सुरु केला. त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाची चर्चा थांबल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.