

BMC Election : काही वर्षांपूर्वी हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. याची देशभरात बरीच चर्चा झाली. पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांनी आणि इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीचा प्रचार करावा का? हा प्रश्न त्यावेळी विचारला गेला.
त्याचवेळी हैदराबादपेक्षा कैकपटीने मोठी असलेली, काही राज्यांचे मिळून जेवढे बजेट नाही तेवढे स्वत:चे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून या सर्व नेत्यांना लांब ठेवले आहे. प्रत्येक भूमिपूजन, उद्घाटनासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, मुंबईच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेले अमित शाह यांची महापालिकेच्या प्रचारासाठी एकही सभा झालेली नाही.
याशिवाय मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय असून यातील बहुतांश मतदार भाजपचा समर्थक मानला जातो. पण तरीही भाजपने सगळ्या उत्तर भारतीय नेत्यांना सायलेंट मोडवर टाकले आहे. ठाकरे बंधूंकडून मराठीचा अजेंडा रेटला जात असताना त्याला उत्तर भारतीय नेत्यांनी उत्तर दिल्यास थेट मराठी विरुद्ध अमराठी (उत्तर भारतीय) असे चित्र उभे राहू शकते. यातून मराठी माणूस दुरावला जाण्याची शक्यता आहे.
हे सगळे टाळण्यासाठी निवडणुकीच्या सुरुवातीपासून भाजपचे उत्तर भारतीय नेते मंगलप्रभात लोढा, किरीट सोमय्या, कृपाशंकर सिंग हे फारसे व्यक्त होताना दिसत नाही. एरवी 'एक्स'वर सक्रिय असणारे मोहित कंबोज यांनी निवडणुका लागल्यापासून एकही ट्विट किंवा विधान केले नाही. किरीट सोमय्या हे भांडूप तर मंत्री मंगलप्रभात लोढा हे दक्षिण मुंबईपुरते मर्यादित झाल्याचे दिसताहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुका अस्मितेभोवती फिरत आहेत. त्यामुळे आधी हिंदू महापौर बसवण्याची भाषा करणारा भाजप आता महापौर हा हिंदू मराठी म्हणू लागला आहे. अशा नाजूक वातावरणात एखाद्या अमराठी नेत्याने मराठीविरोधात काही वक्तव्य केले तर ते अंगलट येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भाजपने आपल्या व शिवसेनेच्या अमराठी नेत्यांना तूर्तास शांत राहण्याचा सल्ला दिल्याचे दिसत आहे. भाजपने मुंबईत शिवसेनेच्या साहाय्याने मराठी मतांमध्ये फूट पाडून तसेच उत्तर भारतीय, गुजराती मतांच्या आधारावर पालिकेच्या सत्तेचे सोपान गाठण्याची रणनीती आखली आहे. या काळात एकही चूक न करता, ठाकरे बंधूंचा मराठी अस्मिता, मुंबईचा मुद्दा हाणून पाडण्याचे नियोजन पक्षाचे आहे.
कृपा व अण्णामलाईचा उत्साह अंगाशी
भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी नुकतेच मिरा-भाईंदर महापालिकेचा महापौर उत्तर भारतीय होईल, असे सांगितले होते. त्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असे वातावरण निर्माण झाले. ते विधान मागे घेण्याची वेळ कृपाशंकर सिंह यांच्यावर आली, तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या 'मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे तर जगाची राजधानी आहे,' या विधानावरून भाजपची अडचण झाली आहे.
या निरीक्षणाला राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी दुजोरा दिला. "सध्या मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती, उत्तर भारतीय असे चित्र आहे. या परिस्थितीत अमराठी नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सोबत असलेला मराठी मतदार दूर जाऊ नये, म्हणून भाजपने आपल्या बोलघेवड्या अमराठी नेत्यांना गप्प केले आहे. संजय निरूपम यांनाही शांत केल्याचे दिसत आहे", असे ते म्हणाले.
तर मुंबईत भाजपचा चेहरा 'मराठी'चा असून तेच बोलत आहेत. अमराठी चेहरे बोलताना दिसत नाही. ते अमराठी मतांची जमवाजमव करीत आहेत. हा भाजपच्या रणनीतीचा भाग असू शकतो, असे निरीक्षण राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी नोंदवले. एकूणच साधी ग्रामपंचायतची निवडणूक दणाणून सोडणाऱ्या भाजपने मुंबईची निवडणूक शांततेत लढण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.
हे चेहरे गप्प
कृपाशंकर सिंह, मोहित कंबोज, किरीट सोमय्या, मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, राजहंस सिंह, अमरजित सिंह, नरेंद्र मेहता, संजय निरूपम (शिवसेना), जयप्रकाश ठाकूर, संजय उपाध्याय, शायना एनसी (शिवसेना)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.