

Shivsena Vs BJP : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी मिळून भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा रचलेला डाव भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी अत्यंत चालाखीने उधळून लावला. ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांच्या जीवावर शिवसेनेने अध्यक्षपदावर आपला उमेदवार बसवण्याची तयारी केली होती त्याच सदस्यांना आपल्या बाजूने फिरवत शिवसेनेची पुरती फजिती केली.
भाजपाच्या विरोधात गुप्तपणे केलेले कांड उघड झाल्यामुळे शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बॅकफूटवर जावे लागले. मित्रपक्षाशी गद्दारीचा प्लॅन उघड झाल्यानंतर नाचक्की झालेल्या शिवसेनेला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून थेट माघारच घ्यावी लागली. या सगळ्या खेळीत धुरंदर ठरले ते राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे. अर्थात त्यांना गंगापूरचे आमदार प्रशांत बंब,फुलंब्रीच्या अनुराधा चव्हाण या आमदार जोडीची भक्कम साथ मिळाली.
शिवसेनेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या जिल्ह्यातील आमदारांनी दाखवलेली एकजूट वाखाणण्याजोगी होती. दुसरीकडे खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे व अब्दुल सत्तार या त्रिकूटाने एकनाथ शिंदेंनी सोपवलेली जबाबदारी वैयक्तिक स्वार्थापोटी नीट पार पाडली नाही. शिवसेनेकडे 21-22 सदस्यांचे संख्याबळ असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भरोशावर घेतलेली जोखीम फेल ठरली.
भाजपने चोहोबाजूने कोंडी केली तरीही जिल्हा परिषदेचे राजकारण पलटवण्यात अब्दुल सत्तार माहीर मानले जातात. त्यांची मुलाला अध्यक्षपद देण्याची इच्छा होती. पण सत्तार स्वतः आमदार, एक मुलगा नगराध्यक्ष असल्याने त्यांना विरोध झाला. मुलाला संधी मिळणार नाही हे ध्यानात येताच सत्तार यांनी अचानक तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. भुमरेंना अध्यक्षपद पुतण्या शिवराजला द्यायचे होते. पण तिथेही अंतर्गत विरोध झाल्याने त्यांनी थेट अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अंगच काढून घेतले.
पालकमंत्री संजय शिरसाट हे जिल्हा परिषदेसाठीच्या महायुतीच्या बैठकांमध्ये चर्चेसाठी आवर्जून हजर होते. मात्र महानगरपालिका निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रमात आपल्याच पक्षातील सहकारी आमदारांनी साथ न दिल्यामुळे ते कमालीचे नाराज होते. ही नाराजी उघडपणे जाहीर न करता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी फारसा रस दाखवला नाही. परिणामी तगडे संख्याबळ जवळ असूनही भाजपच्या राजकीय डावपेचांपुढे शिवसेनेला नांग्या टाकाव्या लागल्या.
महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही शिवसेनेला बॅकफूटवर जावे लागल्याने स्थानिक शिवसेनेचे नेते, पालकमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये खावी लागलेली आपटी एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे व अब्दुल सत्तार यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढल्याची माहिती आहे.
अतुल सावे, प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण या नेत्यांनी शिवसेनेतील अंतर्गत राजकारण आधीच लक्षात घेत चालाखीने पाऊल टाकली. या तिघांनी जिल्हा परिषदेवर फक्त एकहाती वर्चस्वच मिळवलेले नाही तर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदही बिनविरोध राखले. आता अडीच-अडीच वर्षाचा फॉर्मुला भाजपची टर्म संपल्यानंतर अंमलात येणार? की मग सावे संपूर्ण पाच वर्ष जिल्हा परिषदेची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारीवरून इच्छुकांनी शिव्या घातल्या, गाड्या अडवल्या, निषेधाच्या बोंबा ठोकल्या. एवढे करूनही भाजपने 57 नगरसेवक स्वबळावर निवडून आणत महापालिकेत मोठा भाऊ होण्याचा मान पटकावला. त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेत मित्रपक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उपाध्यक्षपदही निळू न देता दोन्ही पद आपल्याकडे राखत जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपचे स्वप्न सत्यात उतरवल्याचे दिसून आले.
एकूणच मंत्री अतुल सावे यांनी गेल्या काही वर्षात शिवसेनेवर कुरघोडी करत आपली छाप जिल्ह्याच्या राजकारणावर पाडल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. जिल्ह्यातील दैदिप्यमान यशामुळे मंत्री अतुल सावे हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक ठरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.