

Maharashtra News: महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य असलेल्या कर्नाटकात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले होते. उपमुख्यमंत्री व कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर प्रचंड दबाव वाढवल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला. यानंतर आता काँग्रेस हायकमांडने विद्यमान मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना राजीनामा देण्यास सांगितले असून डी.के.शिवकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना काँग्रेसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाते.याच डी.के.शिवकुमारांनी महाराष्ट्रातही काँग्रेसचं सरकार वाचवलेलं आहे.
कर्नाटकच्या राजकारणात डी.के.शिवकुमार यांचं मोठं प्रस्थ आहे.ते काँग्रेस हायकमांडसह गांधी घराण्याच्या अत्यंत निकटवर्तीय आणि प्रचंड विश्वासू नेते म्हणून ओळखला जातात.कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारने अडीच वर्षे पूर्ण केल्यानंतर डी.के.शिवकुमारांनी मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावला होता.
डी.के.शिवकुमार हे एक कसलेले राजकारणी असूनही ते शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांनी आत्तापर्यंत विविध राज्यांतील अडचणीत आलेले काँग्रेसचे सरकार वाचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.याचमुळे त्यांना काँग्रेसचे संकटमोचक म्हटलं जातं.
कर्नाटक विधानसभेच्या 2023 च्या निवडणुकीतही त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक चर्चेत होतं. पण ऐनवेळी दिल्लीतून हायकमांडनं कर्नाटकचं राजकारण कोळून प्यायलेल्या अनुभवी सिध्दरामय्या यांच्याकडेच सत्तेची सूत्रे सोपवली. यानंतर नाराज झालेल्या डी. के. शिवकुमारांनी वेगवेगळ्या माध्यमांतून शक्तिप्रदर्शन करत पक्षाला आपली ताकद दाखवण्याचाही प्रयत्न सुरू ठेवला होता.
डी.के.शिवकुमारांचं नाव हे कर्नाटकसोबतच महारा्ष्ट्राच्या राजकारणाशीही गेली कित्येक वर्षे जोडले गेले आहे. त्यांचा 2002 मध्ये महाराष्ट्रातील तत्कालीन विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार वाचवण्यात मोठा वाटा राहिला होता. त्यासाठी त्यांना त्यांचा गाजलेला 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा पॅटर्नच वापरावा लागला होता.
२००२ मध्ये अविश्वास ठरावाला सामोरे जाणारे विलासराव देशमुख यांनी आपल्या सर्व आमदारांना बँगलोरला आणलं होतं. महाराष्ट्रातील विलासराव देशमुख यांचं सरकार पडण्यापासून वाचवण्यासाठी राज्यातल्या 40 काँग्रेस आमदारांना डीके शिवकुमार यांच्या देखरेखीखाली बेंगलोरच्या ईगलटन रिसॉर्टमध्ये ठेवलं गेलं.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारलाही 2002 मध्ये राजकीय परिस्थितीमुळे अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले होते.त्यावेळी विलासरावांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना बँगलोरला नेलं होतं.
डी. के. शिवकुमार यांच्या देखरेखीखाली काँग्रेसच्या 40 आमदारांना बेंगलोर बाहेरील ईगलटन रिसॉर्टमध्ये आठवडाभर सुरक्षित ठेवण्यात आले होते.यावेळी विलासरावांसोबत डी. के. शिवकुमार यांनीही ती परिस्थिती अगदी मुत्सद्दी आणि तितकंच परिपक्कं राजकारण खेळत हाताळली होती.
डी.के.शिवकुमारांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांची काळजी घेत त्यांना पक्षाशी एकनिष्ठ ठेवलं.एकही आमदार फुटू दिला नाही. इतकंच नव्हे तर,या सर्व आमदारांना बेंगलोरहून सुरक्षित आणि वेळेवर अविश्वास प्रस्तावावेळी मुंबईत पोहोचवले. याचमुळे विलासराव देशमुख यांचं महाराष्ट्रातील काँग्रेसचं सरकार वाचलं..
डी.के.शिवकुमारांनी 2017 च्या राज्यसभा निवडणुकीवेळी गुजरातच्या काँग्रेस आमदारांची सुरक्षा डीके शिवकुमार यांच्याकडे सोपवण्यात आली होती.त्यावेळी सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना विजयी करण्यासाठी गुजरातमध्ये डी.के.शिवकुमार हे तळ ठोकून होते.
जवळपास आठवडाभर त्यांनी कडक पहारा देत काँग्रेसचे 44 आमदार बिदादी येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवले होते. डीके शिवकुमार यांच्यामुळेच भाजपला तिथे आमदार फोडण्यात यश आलं नाही. 2018 मध्ये कुमारस्वामी यांचं सरकार वाचवण्याचं श्रेयही डीके शिवकुमार यांनाच दिले जाते.
कर्नाटकात 2018 ला विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट जनादेशाचा कौल न मिळाल्यामुळे निवडून आलेल्या सर्व आमदारांना काँग्रेस पक्षाने विविध रिसॉर्टमध्ये ठेवले होते. त्यानंतर विधानसभेत मतदान करण्यासाठी त्यांना सोबत नेण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.