Somnath Chatterjee: निष्ठा कुठं ठेवायची, हे त्यांच्याकडूनच शिकावं! असा लोकसभा अध्यक्ष होणे नाही...

First Communist Lok Sabha Speaker: पहिल्यांदा 1971 मध्ये बर्दवान लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. 1984 चा अपवाद वगळता 2004 पर्यंत बोलपूर मतदारसंघांतून त्यांनी दहावेळा निवडणूक जिंकली.
First Communist Lok Sabha Speaker
First Communist Lok Sabha SpeakerSarkarnama
Published on
Updated on

राजकारणात हल्ली भ्रष्टाचार, गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजाच्या हितासाठी काम करू इच्छिणारी, चारित्र्यसंपन्न तरुण पिढी आकर्षित व्हावी, असे राजकीय वातावरण सध्या तरी दिसत नाही. प्रस्थापित नेत्यांच्या पुढच्या पिढीनंच सर्व 'स्पेस' काबीज केलेली आहे. एक काळ असा होता, की सर्वपक्षीय नेत्यांना पाहिले की राजकारणाचं आकर्षण वाटायचं. अशा नेत्यांकडं आदरानं पाहिलं जायचं. अशा नेत्यांमध्ये डाव्या पक्षांच्या नेत्यांची सर्वाधिक संख्या होती.

समाजाच्या हितासाठी लढणारे, भ्रष्टाचारापासून दूर राहणारे बहुतांश नेते डाव्या पक्षांमध्ये आढळून यायचे. अशा नेत्यांच्या यादीत सोमनाथ चटर्जी यांचं स्थान अगदी वरचं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून दहा वेळेस लोकसभेत पोहोचलेले सोमनाथ चटर्जी यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं.

लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ प्रचंड गाजला. लोकसभेचं अध्यक्षपद भूषवणारे ते पहिलेच कम्युनिस्ट नेते ठरले. शासकीय निवासस्थानांत खासदारांचे साहित्य, चहा-पानाचा खर्च सरकारकडून केला जातो. आपल्या कार्यकाळात चटर्जी यांनी ही पद्धत बंद केली. परदेशवारीसाठी सदस्यांनी कुटुंबीयांच्या विमान प्रवासाचा खर्च स्वतः करावा, यासाठी ते आग्रही राहिले. त्यांनी स्वतः हे काटेकोरपणं पाळलं.

सोमनाथ चटर्जी यांचा जन्म 25 जुलै 1929 रोजी आसाममधील तेजपूर येथे झाला. त्यांचे वडील निर्मल चंद्र चटर्जी हे त्यांच्या काळातील प्रख्यात वकील होते. काही काल तो कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्तीही होते. त्यांच्या मातुश्रींचं नाव विणापाणि देवी. निर्मल चंद्र चटर्जी हे अखिल भारतीय हिंदू महासभेच्या संस्थापकांपैकी एक होते.

वैचारिक मतभेद असले तरी कम्युनिस्ट नेते ज्योती बसू यांच्याशी त्यांची जवळीक वाढली. त्याला कारण ठरले कम्युनिस्ट पक्षावरील बंदी. केंद्रातील काँग्रेस सरकारनं 1948 मध्ये कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली, पक्षाच्या अनेक नेत्यांना अटक केली. याच्या विरोधात निर्मल चंद्र चटर्जी यांनी आंदोलन केलं होतं. यादरम्यान ते ज्योती बसू यांच्या जवळ गेले.

बॅरिस्टर असलेल्या सोमनाथ चटर्जी यांचं शालेय शिक्षण इन्स्टिट्यूशन स्कूलमध्ये झालं. त्यानंतर कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यांना ब्रिटनमधील प्रतिष्ठित अशा मिडल टेम्पल सोसायटीत स्थान मिळालं. तेथून ते बॅरिस्टर अॅट लॉ झाले.

मिडल टेम्पल सोसायटीतून तेथील बारमध्ये वकीली करण्यासाठी संधी मिळाली. तेथून परतल्यानंतर आणि राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सोमनाथ चटर्जी यांनी कोलकाता उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय केला. सोमनाथ चटर्जी यांचा विवाह 7 फेब्रुवारी 1950 रोजी रेणू चटर्जी यांच्याशी झाला. रेणू या लालगोला येथील एका जमीनदार कुटुंबातील होत्या. प्रताप, अनुराधा आणि अनुशीला ही त्यांची अपत्ये.

First Communist Lok Sabha Speaker
AAP News: जेलवारी करुन आलेले AAP चे दोन माजी मंत्री पुन्हा अडचणीत; गृहमंत्रालयाने उचललं मोठ पाऊल; काय आहे प्रकरण

वडील हिंदू महासभेचे संस्थापक असतानाही सोमनाथ चटर्जी मात्र डाव्या विचारसरणीकडं आकृष्ट झाले. ते 1968 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. 2008 पर्यंत ते या पक्षात होते. त्यांनी 1971 मध्ये पहिल्यांदा बर्दवान लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. 1984 चा अपवाद वगळता 2004 पर्यंत बोलपूर मतदारसंघांतून त्यांनी दहावेळा लोकसभेची निवडणूक जिंकली.

1989 ते 2004 पर्यंत ते लोकसभेत त्यांच्या पक्षाचे नेते राहिले. 1984 मध्ये जादवपूर लोकसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांचा पराभव केला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ही निवडणूक झाली होती. ममता बॅनर्जी यांनी सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळाला होता.

सोनमाथ चटर्जी यांची वक्तृत्वशैली अत्यंत प्रभावी होती. त्यासाठी त्यांची देशभरात ओळख होती. 2004 च्या निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीएचं म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार स्थापन झालं.

यूपीएमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही समावेश होता. डॉ. मनमोहनसिंग हे पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते. त्यावेळी सोमनाथ चटर्जी यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलं. 4 जून 2004 रोजी त्यांची सर्वानुमते लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द संसदीय लोकशाहीसाठी मार्गदर्शक ठरली.

सोमनाथ चटर्जी यांचे वडील निर्मल चंद्र चटर्जी बंगाल हिंदू महासभेचे अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभेचे उपाध्यक्ष होते. हिंदू महासभेच्या उमेदवारीवरच ते 1952 च्या लोकसभा निवडणुकीत हुगळी मंतदारसंघातून विजयी झाले. 1963 मध्ये त्यांनी बर्दवान लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून पोटनिवडणूक निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा दिला होता. 1967 मध्येही ते अपक्ष म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले. 1971 मध्ये त्यांचं निधन झाले. त्यानंतर सोमनाथ चटर्जी यांनी पहिली निवडणूक याच मतदारसंघातून लढवत लोकसभेत प्रवेश केला होता. राजकारणात प्रवेश केल्याच्या तीनच वर्षांनंतर 1971 मध्ये सोमनाथ चटर्जी खासदार झाले.

ममता बॅनर्जी यांच्याकडून झालेल्या परभवाचा अपवाद सोडला तर त्यांचं मताधिक्य वाढतच गेलं. 1998 मध्ये अडीच लाख, 1999 मध्ये एक लाख 86 हजार आणि 2004 च्या निवडणुकीत ते 3 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. त्या काळातील राजकीय नेत्यांमध्ये सौहार्द पाहायला मिळत असे. सोमनाथ चटर्जी यांचेही सर्व पक्षांमध्ये मित्र होते. त्यामुळंच काँग्रेसनं त्यांना लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करण्याचा प्रस्ताव दिला होता.

First Communist Lok Sabha Speaker
Bacchu Kadu: आमदारकी गेली आता बँकेचे संचालकपदही जाणार ? 18 तारखेच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष

सोमनाथ चटर्जी हे स्पष्टवक्ते होते. विविध संसदीय समित्यांववर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांना 1996 मध्ये उत्कृष्ट संसदपटू असा पुरस्कार मिळाला होता. लोकसभेचा अध्यक्ष हा पक्षविरहित असावा, असं त्यांना वाटत असे. त्याच भूमिकेतून त्यांनी कामकाज पाहिलं. पक्षातील अंतर्गत बाबींवरही ते आपलं मत अत्यंत परखडपणे मांडत असत.

पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कारत यांच्या धोरणांवर त्यांनी टीका केली होती. ममता बॅनर्जी यांच्या वाढत्या लोकप्रियतेबाबत त्यांनी पक्षाला सावध केलं होतं. त्यांची भीती खरी ठरली आणि 2011 मध्ये ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव झाला होता. डाव्या पक्षांच्या आणि भारताच्या राजकारणातही एक महत्वाची घटना घडली. त्याच्या केंद्रस्थानी सोनमाथ चटर्जी होते.

2008 मध्ये भारत-अमेरिका अणुकरार विधेयकाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विरोध होता. त्यामुळे पक्षानं डॉ. मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा मागे घेतला होता. पक्षानं चटर्जी यांना लोकसभेचं अध्यक्षपद सोडण्यास सांगितलं होतं, मात्र त्यांनी ते मान्य केलं नव्हतं. त्यामुळं सोमनाथ चटर्जी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून काढून टाकण्यात आलं. कम्युनिस्ट पक्षाचा नेता लोकसभेचा अध्यक्ष होणं ही ऐतिहासिक घटना होती. चटर्जी यांचं पक्षातून निलंबन ही सुद्धा ऐतिहासिक घटना होती.

लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संबंधित नेत्यानं पक्षाचा त्याग करायला हवा. लोकसभा अध्यक्षांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून काम केलं पाहिजे, अशी चटर्जी यांची भूमिका होती. सरकारचा पाठिंबा काढून घेणाऱ्या खासदारांच्या यादीत चटर्जी यांचंही नाव त्यांच्या पक्षानं टाकलं होतं. असं असलं तरी चटर्जी आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले.

त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा पक्षाचा आदेश मान्य केला नव्हता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा काढल्यानंतर सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार होतं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा काढल्यामुळं २२ जुलै २००८ रोजी विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार होतं.

सरकारच्या विरोधात मतदान करणं म्हणजे उजव्या विचारसरणीच्या भाजपला मदत करण्यासारखंच होतं. त्यामुळं सरकारच्या विरोधात मतदान करण्याच्या पक्षादेशाचं चटर्जी यांनी पालन केलं नाही आणि ते लोकसभा अध्यक्षपदावर कायम राहिले. डॉ. मनमोहनसिंग यांच सरकार वाचलं होतं. त्यांनी त्या दिवशी हाताळलेल्या सभागृहाच्या कामकाजाचं देशभरात कौतुक झालं, मात्र पक्षाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागलं.

त्यावेळी काँग्रेसचे 142 आणि डाव्या पक्षांचे 62 खासदार होते. त्यामुळं एका अर्थानं सत्तेच्या चाव्या कम्यिनुस्ट पक्षांच्या हाती होत्या. असं असतानाही डॉ. मनमोहनसिंग यांचं सरकार वाचलं ते समाजवादी पक्षामुळं. मुलायमसिंह यांचा समाजावदी पक्ष त्यावेळी कोणत्याही आघाडीत नव्हता. समाजवादी पक्षाचे 36 खासदार होते. या खासदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं मतदान केलं होतं.

राजकीय डावपेचांत काँग्रेसनं कम्युनिस्टांचा पराभव केला होता. चटर्जी यांना पक्षातून काढून टाकून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं त्यापेक्षा मोठा नैतिक पराभव ओढवून घेतला होता. पक्षानं चटर्जी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. पक्षाच्या आदेशाचं पालन केलं नाही म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं.

सोमनाथ चटर्जी यांच्यामुळं पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं त्यांचं पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात येत आहे, असा निर्णय पक्षाच्या पॉलिट ब्यूरोनं घेतला होता. 23 जुलै 2008 रोजी चटर्जी यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. चटर्जी यांनी राज्यघटनेनुसार काम केलं असेल, मात्र पक्षाच्या सदस्यांसाठी पक्षाची राज्यघटना सर्वोच्च आहे, अशी प्रतिक्रिया त्यावेळी पक्षाचे पश्चिम बंगाल सचिव बिमन बोस यांनी व्यक्त केली होती.

First Communist Lok Sabha Speaker
Tamil Nadu : तमिळ-हिंदी वादाला तोंड फुटलं; '₹' चिन्ह हटवलं; अर्थमंत्री संतापल्या!

पक्षातून निलंबन झाले तो दिवस माझ्या आय़ुष्यातील सर्वात दुखःद दिवस होता, अशी खंत सोमनाथ चटर्जी यांनी व्यक्त केली होती. भविष्यात लोकसभा अध्यक्षपदी निवड झालेल्या नेत्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे,अशी सूचना त्यांनी केली होती.

सभागृहाचं कामकाज पक्षविरहित, निपःक्षपातीपणं व्हावं, यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांचं मत होतं. पक्षातून काढून टाकल्यानंतर 2009 मध्ये निवडणूक न लढवण्याची, राजकारणातून निवृ्त्ती घेण्याची घोषणा त्यांनी केली आणि त्यानंतर सक्रिय राजकारणातून ते बाजूला झाले होते. चटर्जी यांनी आयुष्यभर कामगार, वंचित, शोषितांच्या उत्थानासाठी काम केलं. या घटकांचा त्यांनी स्वतःला कधीही विसर पडू दिला नाही. त्यांच्या हितासाठी आवाज उठवण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही.

परखड वक्तृत्वशैली आणि त्याला असलेली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या, राजकारणाच्या अभ्यासाची जोड, यामुळं त्यांच भाषण अत्यंत प्रभावी होत असे. त्यांचं भाषण सभागृहातील सर्वच सदस्य एकाग्र चित्ताने एेकत असत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातच लोकसभा टीव्ही या दूरचित्रवाहिनीची सुरुवात झाली. त्यांच्या पुढाकारानं भारतीय लोकशाहीच्या समृद्ध परंपरेची माहिती देणाऱ्या अत्याधुनिक संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. हे संग्रहालय नागरिकांसाठी खुलं आहे.

संसदीय लोकशाही की राजकीय पक्ष? लोकसभेच्या अध्यक्षपदावर असताना निष्ठा कुठे दाखवायची, याचा मार्ग सोमनाथ चटर्जी यांनी दाखवून दिला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी राजकारणात आलेल्या चटर्जी यांनी पुढची 40 वर्षे सक्रिय राजकारणात घालवली. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर मात्र ते विजनवासात गेले.

पक्षाचे सामान्य कार्यकर्ते त्यांना भेटत असत, त्यांच्या संपर्कात राहत असत, मात्र नेत्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. त्यांनी पुन्हा पक्षात यावं, यासाठी प्रयत्न झाले, मात्र त्याला यश आले नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर पुन्हा प्रवेशासाठी स्वतः अर्ज करावा लागतो. मात्र चटर्जी यांनी स्वतःहून अर्ज करणं शक्यच नव्हतं.

सोमनाथ चटर्जी यांचं 13 ऑगस्ट 2018 रोजी निधन झालं. त्यांचा मृतदेह पक्षाच्या ध्वजात गुंडाळण्याचा प्रस्ताव मार्क्सवादी पक्षाकडून आला होता, मात्र कुटुंबीयांनी तो नाकारला. मोहन बागान क्लबसोबत चटर्जी यांचे संबंध होते. या क्लबच्या ध्वजात त्यांचा मृतदेह गुंडाळण्यात आला होता. त्यांनी उच्च न्यायालयात वकिली केली होती.

अंत्यदर्शनासाठी त्यांचा मृतदेह तेथे ठेवण्यात आला. सीताराम येचुरी वगळता पक्षाचे अन्य नेते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले नाहीत. जे कुणी नेते आले होते, त्यांना सोमनाथ चटर्जी यांच्या कुटुंबीयांनी बाहेर घालवले. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर चटर्जी यांनी पक्षाच्या विरोधात एकही वक्तव्य केलं नव्हतं. त्यांनी पक्षाशी असलेलं भावनिक नातं अखेरपर्यंत जपलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com