Suraj Chavan : माजी पोलिस पाटलांचा मुलगा...डावखरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीसोबत; पण एका घटनेमुळे सूरज चव्हाणांच्या राजकारणाला ‘ब्रेक’

NCP News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्यावर पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तसेच, पक्षाची भूमिकाही ते माध्यमांपुढे मांडत होते.
Suraj Chavan
Suraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 21 July : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यापुढे पत्ते फेकणारे छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाटगे यांना बेदम मारहाण करणारे सूरज चव्हाण यांच्याकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. या मारहाणीनंतर सूरज चव्हाण कोण आहेत, त्यांची राजकीय वाटचाल याबाबत उत्सुकता आहे. एका माजी पोलिस पाटलांचा मुलगा... निरंजन डावखरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या संपर्कात ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशी चढती राजकीय कमान चढणाऱ्या सूरज चव्हाण यांच्या कारकिर्दीला मारहाणी घटनेमुळे ‘ब्रेक’ लागला आहे, हे मात्र नक्की.

सूरज चव्हाण हे मूळचे लातूर (Latur) जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कारेवाडी गावचे आहेत. या कारेवाडी गावातच त्यांचे बालपण गेले आहे. चव्हाण यांचे वडिल गावचे पोलिस पाटील होते. विद्यार्थीदशेतच असतानाच चव्हाण हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या संपर्कात आले. डावखरे यांच्या माध्यमातून सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

सूरज चव्हाण (Suraj Chavan) राष्ट्रवादी काँग्रेससोबत असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या वेळी शपथ घेतली होती. त्यावेळी अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात सूरज चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तेव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण तत्पूर्वी एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवकचे कार्याध्यक्ष होते.

आमदारांना परत आणण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली असली तरी त्यानंतर ते अजित पवार यांच्या निकट गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या पहिल्या काही नेत्यांमध्ये सूरज चव्हाण यांचा समावेश होता, त्यामुळे ते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात आहेत.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्यावर पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तसेच, पक्षाची भूमिकाही ते माध्यमांपुढे मांडत होते. त्यामुळे चव्हाण हे अनेक अर्थाने पक्षाच्या विविध भूमिका पार पाडत होते. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या ‘निर्धार नवपर्वा’च्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यात सहभागी झाले होते.

Suraj Chavan
Sunil Tatkare : सुनील तटकरेंचा संतोष पवारांना शब्द; ‘तुमच्या तक्रारीची नोंद घेतलीय; तिकिट वाटपात ढवळाढवळ होऊ देणार नाही’

लातूरमध्ये पत्रकार परिषद सुरू असताना छावा संघटनेचे विजय घाटगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री कोकाटे यांच्या निषेधार्थ तटकरे यांच्यापुढे पत्ते फेकले. आपल्याच गृहजिल्ह्यात आपल्याच पक्षाच्या नेत्याला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले, याचा राग सूरज चव्हाण यांना आला असावा. त्यातूनच त्यांनी आपण जबाबदार पदावर असल्याचे त्यांचे भान सुटले असावे, त्यातूनच त्यांनी घाटगे यांना मारहाण केली. मात्र, त्यांचा हा आततायीपणा त्यांच्याच अंगलट आला आहे.

सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीवरून राष्ट्रवादीवर राज्यभरातून टीका होऊ लागली. अगोदरच कोकाटेंच्या प्रतापामुळे बॅकपूटवर गेलेल्या पक्षनेतृत्वाने सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. मात्र, विद्यार्थीदशतेच राष्ट्रवादीसोबत जोडले गेलेल्या चव्हाण यांनी अवघ्या काही वर्षांतच पक्षाच्या महत्वाच्या पदापर्यंत मजल मारली होती. भावनेच्या आवेगात येऊन केलेल्या मारहाणीमुळे सूरज चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला आहे.

Suraj Chavan
Solapur NCP Dispute : राष्ट्रवादी सोलापूर शहराध्यक्षांनी केली उमेश पाटलांची तटकरेंकडे तक्रार; म्हणाले, ‘शहरात येऊन डिस्ट्रर्ब करत आहेत, तिकिटाचे आमिष दाखवत आहेत’

सूरज चव्हाण यांचे बंधू कारेवाडी गावचे सरपंच आहेत, तर त्यांचे वडिल माजी पोलिस पाटील आहेत. सत्ताधारी पक्षात असल्यामुळे चव्हाण यांनी आपल्या गावात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. पण मारहाणीमुळे या सर्वांवर पाणी फेरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com