Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची आपली भूमिका महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून पत्र लिहित विशद केली आहे. मात्र, त्यातील मजुकरावर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. सल्ला देताना आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत, असेही नमूद केले आहे.
राज्य विधीमंंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी झालेल्या जयंतरावांनी चौफेर फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांपासून सुरुवात करत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोल्लाचा पण महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. जयंतरावांचा हा सल्ला अजितदादा मानतात का, हे पाहावे लागेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जयंत पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माझी कामाची पद्धत एकच आहे, असे म्हटले आहे. त्यावर आमचा अजिबात आक्षेप नाही. पण, दुसऱ्यांचा आक्षेप येण्याची शक्यता आहे. कारण, तिकडं असं काही चालत नाही. इकडे (आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये) काहीही चालतं. पण, आपली तुलना कोणाशी करायची, याचे भान तिकडे (भाजपसोबत) गेल्यावर ठेवणे आवश्यक आहे. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत, त्यामुळे आमचा अजितदादांना सल्ला आहे.
अलिकडे अजितदादा काय भेटतच नाहीत. त्यांचं पत्र महाराष्ट्रातील जनतेला पोहोच झालेले आहे. त्यावर मी जास्त काही बोलत नाही. पण, गेली सहा ते सात महिने झाले, आम्हाला सोडून ते तिकडे गेले आहेत. त्यानंतर त्यांनी सात महिन्यांनंतर ते पत्र महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून लिहिले आहे, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.
अजितदादांनी पत्रात काय म्हटले आहे?
वडिलधाऱ्यांविषयी आमची कायमच आदराची भावना आहे. युवकांना विविध ठिकाणी संधी देणे आणि समवयस्कांना सोबत घेऊन जाणे असेच काम मी आजपर्यंत केले आहे. मी आज फक्त भूमिका बदलली आहे. मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे सत्ता असेल तर वेगाने मार्गी लागतील, ही माझी स्वच्छ भूमिका आहे. कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता आणि यापुढेही नसेल, असेही अजित पवार यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे. कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.