
Mumbai News : मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पाच दिवस आंदोलन केले. यावेळेस आरक्षण उपसमितीने मध्यस्थी करीत आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले होते. मात्र, उपोषण सोडताना गडबड झाली. व्यासपीठावरूनच जरांगे पाटील यांनी हा जीआर पटला आहे का? अशी ओरडून विचारणा केली होती. त्यावेळी खाली बसलेल्या मराठा आंदोलकांनी दोनवेळा नाही असे म्हटले होते. त्यावेळी मला काही जणांनी व्यासपीठापासून दूर सारले होते, असे सांगत ‘मराठ्यांना GR पटलाच नव्हता’ असे मोठे विधान टीम जरांगेमधील वकील योगेश केदार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केले आहे.
आंदोलन मिटवण्यासाठी मंगळवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn Wikhe patil) यांच्या नेतृत्वाखालील उपसमिती व्यासपीठावर आली. त्यावेळी त्यांच्याकडून आलेला जीआर जरांगे पाटील यांनी वाचून दाखवला. त्यावेळी मी व्यासपीठाजवळ उभा होतो. व्यासपीठावरूनच जरांगे पाटील यांनी हा जीआर पटला आहे का? अशी ओरडून विचारणा केली होती. त्यावेळी मी दोनवेळा हाताने इशारा करीत नाही, असे म्हणाले होतो. त्यावेळी खाली बसलेल्या मराठा आंदोलकांनी नाही, असे म्हटले होते. त्यावेळी मला काही जणांनी व्यासपीठापासून दूर सारले होते. मात्र, मला त्याचवेळी लक्षत आले होते की, या जीआरमध्ये गडबड आहे. त्यामुळे मी वेळ वाढवून घेण्याची विनंती करीत असल्याने मला बाजूला करण्यात आले, असेही केदार म्हणाले.
त्याचवेळी काही वकील मंडळींना व कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांना हा जीआर फसवा असल्याचे लक्षात आले होते. त्यावेळी मी हा प्रकार जरांगे (Manoj Jarange) यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला दूर सारण्यात आल्याने मला त्यांना काहीच सांगता आले नाही. त्याचवेळी गेवराईचे काकडे हे व्यासपीठाजवळच होतो. त्यांनी देखील हा प्रकार सांगितला. मात्र, व्यासपीठावरून जाऊन हा प्रकार कोणी सांगण्यास तयार नव्हता.
आंदोलकांची वाशी येथे झाल्याप्रमाणे फसवणूक झाली
सरकारकडून काढण्यात आलेला जीआर हा समाजाचा विश्वासघात करणारा आहे. त्यामुळे योगेश केदार यांनी या जीआर बाबत माहिती असताना समाजाला त्याची माहिती दिली नाही. याचा अर्थ केदार यांनी समाजाची फसवणूक केली असती असा झाला असता. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलकांची वाशी येथे झाल्याप्रमाणे फसवणूक झाली असल्याचे केदार यांनी स्पष्ट केले.
केवळ मराठा समाजाविषयी असलेल्या तळमळीतून सांगत होतो. यामध्ये माझा काहीच स्वार्थ नव्हता. या आंदोलनामुळे सरकार बॅकफूटवर आले होते. कोणालाही हात लावण्याची धमक त्यांच्यात नव्हती. त्यामुळे संधी चालून आली होती. मात्र, जरांगे पाटील यांच्यासोबत एक सर्कल तयार झाले होते. ते केवळ त्यांच्या हो मध्ये हो मिसळणारी मंडळी व्यासपीठावर होती. सर्व कायद्यांचे अभ्यासक हो म्हणत असताना मी एकटा नाही म्हणत नव्हतो. वेळ मागवून घ्या, असे सांगत होतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
या सर्कलमध्ये असलेली मंडळी मिळाले, मिळाले म्हणून जल्लोष करीत होते. आम्ही काही जण मात्र वाचून पडताळणी करीत होतो. त्याचवेळी ही मंडळी आपला विजय झाला आहे, आपल्याला आरक्षण मिळाले, अशी माइकवरून घोषणा करीत होते. मी त्यांना स्टेजच्या खालूनच सांगत होतो, हा आपला विजय नसून वाशीप्रमाणे सरकार आपल्याला फसवत असल्याचे सांगत होतो. त्याचवेळी मी या मंडळींना हात जोडून विनंती करीत होतो, असेही केदार यांनी सांगितले.