
तुरुंगात मनाचा निर्धार खूप असला आणि आम्ही वातावरण जागृत आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा प्रत्येकाच्या काही समस्या होत्याच. अनेक जण एकटेच मिळवणारे होते. त्यामुळे त्यांच्या घरचे प्रश्न फार बिकट झाले होते. कोणी आजारी पडले तर तुरूंगामध्ये एकच डॉक्टर असायचे. परंतु अनेकांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असायची, त्यावेळेला ससूनमध्ये घेऊन जायचे.
मी लहानपणापासून किरकोळ शरीर यष्टीचा होतो. माझ्या छातीमध्ये एक मरमर ऐकू यायची त्यामुळे तुरूंगामध्ये आल्यावर मी छातीचा काय त्रास आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये एकदा डॉक्टर चकोर आले होते. त्यांनी मला तपासले आणि लगेच ससूनमध्ये ॲडमिट होऊन कार्डियाक कॅथेटरायझेशन करायला सांगितले.
मी ससूनमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी परीक्षण झाल्यावर लक्षात आले की माझ्या हृदयामध्ये वरच्या दोन कप्प्यांच्या मध्ये एक छिद्र आहे, जे खरंतर जन्मतः असतं आणि लगेच मिटते. पण काही जणांचे मिटत नाही. त्याला एएसडी. (ASD) असे म्हणतात. त्यासाठी त्यावेळी ओपन हार्ट सर्जरी करणे हा एकच उपाय होता आणि भारतात तो नुकताच सुरू झाला होता.
१९७६ च्या एप्रिलमध्ये त्यावेळी नुकतेच परदेशातून आलेले आणि अतिशय तेजस्वी असे डॉक्टर अशोक कानेटकर (Ashok Kanetkar) यांनी मला तपासून, शस्त्रक्रिया करू असे सांगितले. त्यावेळी ओपन हार्ट सर्जरीचे नाव ऐकताच अनेकांना धक्का बसायचा. तसा तुरूंगामध्ये, आमच्या घरी, माझे मित्रमंडळी आणि सहकारी यांना सुद्धा हा धक्काच होता. त्यावेळी ओपन हार्ट सर्जरीनंतर होणाऱ्या इन्फेक्शन्समुळे खूप जण दगावयाचे. मला मात्र तणाव आला नाही, कारण डॉक्टर कानेटकर यांच्या शब्दावर माझा विश्वास होता आणि मी निश्चित बरा होईल याची मला मनातून खात्री होती.
हे अशासाठी सांगतोय की त्यावेळी ओपन हार्ट सर्जरी म्हणजे यशस्वी होण्याची फार कमी शक्यता होती. आता मात्र तंत्रज्ञान बदलले. आता केवळ पायातील व्हेन्समधून एक कॅथेटर घालून जसे पंक्चर बसवतात तसे नळीनेच छिद्र बुजवतात. छाती उघडावी लागत नाही पण १९७६ मध्ये शस्त्रक्रिया अवघड होती. छातीचा पिंजरा उघडून, हृदय बंद करून, काही काळ कृत्रिमरीत्या हार्ट लंग मशिनवर ठेवतात. मी माझ्या हृदयाला १८ मिनिटे विश्रांती दिली. त्यावेळेत हे छिद्र शिवले जाते. त्यानंतर सगळ्या नळ्या पुन्हा जोडून हे ऑपरेशन होत असे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेमध्ये इन्फेक्शन होण्याचा मोठा धोका असायचा.
अनेक रुग्ण त्याला बळी पाडायचे. पण माझ्या मनात कधीच चलबिचल झाली नाही. मी डॉक्टरांना एवढेच विचारलं की हे ऑपरेशन करून, मला कुठले काम करता येणार नाही अथवा अपंग होईल असे काही आहे का? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की शरीरातला दोष नाहीसा झाल्यामुळे, तू ठणठणीत काम करू शकशील. त्यावेळी पुणे चेस्ट हॉस्पिटल औंध येथेच ऑपरेशन व्हायचे.
तेथे कैद्यांना नेण्यासाठी गृह खात्याची परवानगी लागायची. त्यामुळे अनेक दिवस मला ससून मध्ये ठेवले होते. त्या ठिकाणी माझे नातेवाईक,मित्र यायचेच पण तुरूंगामधून आमचे राजबंदी सहकारी यायचे. तेही मला भेटायचे. विशेषत महिला राजबंदी नेत्या अहिल्याताई रांगणेकर, जयवंतीबेन मेहता, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, हंसाबेन राजदा या सगळ्या मला आठवड्यात किमान दोन-तीन वेळा भेटायच्या आणि खूप गप्पा मारायच्या.
ज्या दिवशी मी औंध हॅास्पीटलकडे निघालो, तेव्हा या सगळ्या महिला तिथे मला निरोप द्यायला आल्या होत्या कारण त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये येता येणार नव्हते. मी प्रत्यक्ष पोलिस जीपमध्ये बसून रुग्णालयात निघालो, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, ते मी कधीच विसरणार नाही. तुरूंगामधून जेव्हा मी ससून हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी दाखल होण्यासाठी निघालो त्यावेळी सुद्धा तुरूंगामधल्या सर्व कैद्यांनी शुभेच्छा देऊन, निरोप दिला. अनेकांच्या डोळ्यांमध्ये ही भीती मला दिसत होती की, आत्ता आपण याला पाहतोय, पण ऑपरेशननंतर काय होईल हे सांगता येत नाही.
मी त्यावेळी म्हणालो की तुम्ही काळजी करू नका, मी परत येईन. औंध रुग्णालयामध्ये १४ जून रोजी माझे ऑपरेशन झाले. डॉक्टर कानेटकर त्यांच्या टीमसहित तयार होते. तत्पूर्वी शरीरावरचे सगळे केस काढून जवळजवळ स्पिरीटनी अंघोळ घालतात. पांघरूणाने झाकून घेतले होतं. ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यावर एकदम पांघरूण काढले त्यावेळेला स्पिरीटचा घमघमाट आला. त्यावेळी मी म्हणालो की , ‘Now you will realise, how a spirited man smells’. सगळ्या डॉक्टरांनी उत्तम ऑपरेशन केले. पण भूल उतरायला रात्रीचा एक वाजला आणि ज्या वेळेला भूल उतरली, त्यावेळेला मी पाहत होतो की डॉक्टर कानेटकर माझ्या बेडजवळ खोलीमध्ये बसून होते. डॉक्टरांचे असे प्रेम मिळालं.
माझा रक्तगट ओआरएच निगेटिव्ह असा दुर्मिळ होता. १५ बाटल्या ताजे रक्त लागणार होते. विद्यार्थी परिषदेतील माझ्या सहकाऱ्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केलं. माझ्या ऑपरेशनच्या दिवशी औंध रुग्णालयामध्ये ८५ जणांची रांग लागली. आमचे मित्र, माझ्या पाहऱ्यावरील एक पोलिस, महिला पोलिस यानी सुद्धा रक्त दिले. त्यावेळी मला एकूण बारा बाटल्या रक्त लागले. त्यामुळे डॉक्टर, रक्तदाते आणि मित्र यांच्याविषयी माझ्या मनात कायम कृतज्ञता राहिली. आपल्याला ही सेकंड इनिंग मिळाली, ती आपण समाजाच्या कामासाठी लावायची हा माझा निर्धार आणखी पक्का झाला.
१४ जूनला ऑपरेशन झाल्यावर एका आठवड्याने डॉक्टर म्हणाले की, इन्फेक्शनचा धोका असल्याने घरी जा. पण मी राजकीय कैदी असल्यामुळे, पॅरोलशिवाय घरी जाता येणे शक्य नव्हते. म्हणून शेवटी २७ जूनला पुन्हा मी तुरूंगात गेलो. तेथील सहकाऱ्यांनी माझी सर्व प्रकारची काळजी घेतली. त्यानंतर १५ जुलैला म्हणजे जवळजवळ १८ दिवस राहिल्यावर, मला एक महिन्यासाठी पॅरोल मिळाला आणि मी घरी आलो. एक विशेष गोष्ट अशी झाली, की १५ ऑगस्ट रोजी माझा पॅरोल संपला आणि मी देशाच्या स्वातंत्र्यदिनी पुन्हा तुरूंगात बंदी म्हणून दाखल झालो. २६ जानेवारी १९७७ रोजी आमची मुक्तता झाली. त्यानंतर देशातली क्रांती कशी झाली ते मी आधीच सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.