Mumbai, 03 September : लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या अपयशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ आणि संघाशी संबंधित असलेल्या ‘विवेक’मधून अजित पवार यांच्या पक्षाबरोबर झालेल्या युतीला जबाबदार धरण्यात आले होते. कार्यकर्त्यांकडूनही अजित पवारांबरोबर असलेली युती तोडण्याची भाषा केली होती.
मात्र, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संघाने केलेला दावा खोडून काढला आहे. अजित पवारांसोबत युती केल्यामुळे नव्हे; तर उद्धव ठाकरे सोडून गेल्यामुळे भाजपचे नुकसान झाले, असे दानवेंनी म्हटले आहे.
मी ऑर्गनायझर वाचलेला नाही. पण, वैयक्तिक भावनेच्या आहारी जाऊन काही जण अशी वक्तव्ये करतात. पण ती काही पक्षाची भूमिका नाही. ती त्यांची वैयक्तीक भूमिका आहे. एखाद्या माणसाचा आपल्या स्थानिक मतदारसंघात एखादा रोष असतो. त्याचा तो रोष व्यक्त करतात. पण ती आमच्या पक्षाची भूमिका नाही, अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मांडली.
राज्याच्या राजकारणात कधी नाहीत, एवढ्या घडामोडी गेल्या पाच वर्षांत घडल्या आहेत. भाजप-शिवसेनेला जनतेने बहुमत दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी असंगाशी संग केला. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणाला विरोध केला, त्या काँग्रेस पक्षासोबत ठाकरे गेले. त्यांनी निकालाच्या दिवशीच आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगितले. त्यानंतर ठाकरे तिकडे गेले, त्यामुळे आमचे सरकार बनू शकले नाही.
एकनाथ शिंदे आमच्याकडे आल्यानंतर आमचं सरकार बनलं. त्यानंतर अजित पवारही (Ajit Pawar) आमच्या सोबत आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्हाला प्रश्न विचारण्यात आला की, अजितदादा तुमच्यासेाबत आल्याने भाजपचे नुकसान झाले का. त्यावर आम्ही स्पष्टपणे सांगितले की, अजितदादा आल्यामुळे आमचं नुकसान झालं नाही, तर उद्धव ठाकरेंनी धोका दिल्यामुळे आमचं सरकार बनू शकलं नाही आणि आमचं नुकसान झालं.
भाजप आणि शिवसेनेच्या विचाराशी बांधिलकी असणारा एक मतदार होता. शिवसेना महाविकास आघाडीत गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली, त्यामुळे अजित पवारांमुळे नव्हे; तर उद्धव ठाकरे आमच्यापासून दूर गेल्यामुळे आमचे नुकसान झाले आहे, असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.
ऑर्गनायझर अन् विवेकमध्ये काय म्हटले होते?
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मधून अजित पवार यांना जबाबदार धरण्यात आले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केल्यामुळे भाजपची ब्रॅंड व्हल्यू घसरली, अशी टीका करण्यात आली होती.
ऑर्गनायझरनंतर ‘विवेक’मधूनही अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. शिवसेनेबरोबरची युती ही नैसर्गिक आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती भाजप कार्यकर्त्याला आवडलेली नाही, असा मुद्दा मांडण्यात आला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.