
Satara Politics : पाटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ गट व पंचायत समितीचे १४ गण आहेत. काही महिन्यांपूर्वी सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते महायुतीचे घटक बनले आहेत. महायुतीतील शिवसेनेचे नेते तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे तालुक्यात मैत्रिपूर्ण लढत होणार, की गेल्या सत्तेतील विजयी जागा वाटून घेणार? यावर सर्वकाही अवलंबून आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस, मनसे या पक्षांना मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.
१९८३ पासून २००२ व २००७ मधील अडीच वर्षांचा अपवाद वगळता पंचायत समितीवर पाटणकरांचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत पाटणकरांच्या राष्ट्रवादीने सातपैकी चार गटांत, तर तत्कालीन शिवसेनेला दोन गट व पंचायत समितीच्या सहा गणांत विजय मिळाला होता. पंचायत समिती ताब्यात ठेवण्यात पाटणकरांना यश आले होते. मल्हारपेठ गटात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांना पक्षाने उमेदवारी व एबी फॉर्म दिल्याने मंत्री देसाई यांनी पाटण तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून विजय पवार यांना रिंगणात उतरवले होते. तिरंगी लढतीत विकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे मंत्री देसाई यांनी तिसरा गट पदरात पाडून शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार व जिल्हाध्यक्षांचा पराभव केला होता. आता पाटणकर भाजपवासी झाल्याने पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी व देसाई पालकमंत्री असल्याने पदाचा मान राखण्यासाठी दोघांनाही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
जिल्हाध्यक्ष कदम आहेत कुठे?
जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळवून मल्हारपेठ गटात दोन नंबरची मते घेणारे तत्कालीन व सध्या ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर गायबच आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर, तालुक्यातही त्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवातही ते कुठेही दिसले नाहीत. एकमेव तालुकाध्यक्ष सुरेश पाटील धडपडताना दिसत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे, तरीही पक्षाची बैठकही झालेली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्हाध्यक्ष शोधमोहीम राबवावी लागेल की काय? अशी परिस्थिती असल्याचे बोलले जात आहेत. आगामी निवडणुकीत एखादा उमेदवार उभा करताना त्यांना अग्निदिव्य पार पाडावे लागेल, अशी स्थिती आहे.
दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसचीही परीक्षा
शिवसेना व राष्ट्रवादी फुटीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची जी स्थिती आहे तीच इतरांची आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला तालुक्यात संघटना नाही. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकरही नुकतेच भाजप सोडून अजित पवारांकडे गेले आहेत. अधिकृत प्रवेश झाल्याने ते स्वतः म्हावशी गटात उमेदवारी करतील. मात्र, अन्य २० उमेदवार उभे करताना त्यांची दमछाक होऊ शकते. पाटणकरांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला कोणी वालीच राहिलेला नाही. माजी खासदार श्रीनिवास पाटील व त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांचेही संघटना बांधणीकडे फारसे लक्ष नाही. तसा प्रयत्नही त्यांनी केलेला नाही.
तीन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व व सिक्कीमचे राज्यपाल अशा पदावर काम केलेल्या श्रीनिवास पाटील हे तालुक्याचे भूमिपुत्र आहेत. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तालुक्यात जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी धडपड करणे गरजेचे आहे. १९९९ पासून कॉँग्रेसचा चेहरा असलेल्या ढेबेवाडीचे हिंदूराव पाटील हेही भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसची धुरा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्यावर असून, ते निवडणूक किती मनावर घेतात? यावर सर्व बाबी अवलंबून आहेत. राज ठाकरेंची मनसेची ताकद मर्यादित आहे. तालुकाध्यक्ष गोरख नारकर दोन- चार उमेदवार उभे करण्याची परंपरा अबाधित ठेवतील.
राजकारण फिरणार दोन्ही गटांभोवतीच
गेल्या पाच वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. या वेळी शिवसेनेची धुरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय देसाई गटाकडे, तर भाजपची धुरा पाटणकर गटाकडे राहणार आहे. पक्ष व चिन्ह बदलले, तरी देसाई-पाटणकर या घराण्याभोवती राजकारण फिरणार आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे या चार पक्षांची काही गटांत उमेदवार उभे केल्यास किंवा उमेदवारी डावलल्यास होणारी नाराजीही राजकीय गणिते बिघडवू शकतात, हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.