Uddhav Thackeray : 'त्यांना' धडा शिकवण्याचा उद्धव ठाकरेंचा चंग पूर्णत्वाला जाणार?

Maharashtra Political Crises : शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात एकजूट व्हा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते.
Uddhav Thackeray :
Uddhav Thackeray :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : गेल्या वर्षी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट पडली. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले आणि शिवसेनेतून ४० आमदारांना घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. त्यावेळेपासून आजपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना आस्मान दाखवा, त्यांना पाडण्यासाठी एकजूट व्हा, असे आवाहन उद्धव ठाकरे सातत्याने करत आहेत.

- आमदारांची धाकधूक वाढली

यंदाच्या दसरा मेळाव्यातही त्यांनी त्यांच्या भाषेत गद्दारांचा समाचार घेतला. शिवसेना तर सोडली, मात्र आता विधानसभेची निवडणूक जवळ येईल तशी या बाहेर पडलेल्या आमदारांची धाकधूक वाढली आहे. त्याला कारणही तसेच आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना कार्यकर्ते आणि मतदार धडा शिकवतात, हा इतिहास आहे. याचा फटका छगन भुजबळ,नारायण राणे अशा मातब्बर राजकारण्यांना बसला आहे.

Uddhav Thackeray :
Gram Panchyat Election : ओबीसी यात्रेनं विरोधकांना गेलं जड, आता देशमुख करताहेत मजबूत भाजपचा गड

शिवसेनेतील फूट

एकनाथ शिंदे आणि ४० आमदार सोडून गेल्यानंतर शिवसेनेला गळती लागली. एकापाठोपाठ एक नेते उद्धव ठाकरेंना सोडून गेले. अशावेळी काहीजण उद्धव ठाकरे यांच्यासोबतही राहिले. त्यात प्रामुख्याने घ्यावे असे नाव सुषमा अंधारे यांचे आहे. अंधारे या भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या.उत्कृष्ट वक्तृत्व आणि त्याला गहन अभ्यास, चिंतनाची जोड असलेल्या अंधारे यांनी फुटीर आमदारांच्या नाकीनऊ आणले. महाप्रबोधन यात्रा काढून शिवेसेतून बाहेर पडलेल्या सर्व आमदारांच्या मतदरासंघात त्या गेल्या, आपल्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला. त्यामुळे फुटीर आमदारांविरुद्ध वातावरणनिर्मिती झाली. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना आस्मान दाखवा, असे उद्धव ठाकरे जे बोलले होते, त्या दिशेने जाण्याची सुरुवात सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेद्वारे सुरू झाली होती.

- आमदार अपात्रता याचिका

दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर अद्यापही निर्णय झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तो आता लवकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे आमदार अपात्र होतील, असा विश्वास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला आहे. अपात्रतेचा निर्णय लवकर येईल आणि तो आपल्या बाजूनेच येईल, असे गृहीत धरूनच कदाचित महाप्रबोधन यात्रा सुरू करण्यात आली होती. तसे झाले असते तर उद्धव ठाकरे यांना मोठा फायदा झाला असता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

-निवडणुका जिंकण्याचा महायुतीला नाही विश्वास

शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांचे निकाल महाविकास आघाडीसाठी आशादायक असे लागलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्याचे कारण काहीही असले तरी आपण या निवडणुका जिंकू शकतो, याचा महायुतीला अद्याप विश्वास आलेला नाही, हेही एक कारण आहे.

- राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट

उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यासाठी शिंदे गट आणि भाजपने एक फळी तयार केली आहे. त्या फळीतील नेत्यांकडून सातत्याने ठाकरेंवर टीका केली जात आहे. ठाकरे यांना असलेली सहानुभूती कमी करण्याचा तो एक नियोजनबद्ध प्रयत्न आहे. शिवसेनेपाठोपाठ काही महिन्यांतच राष्ट्रवादी काँग्रेसलाही फुटीचा सामना करावा लागला. अजितदादा आमदारांसह बाहेर पडले. अर्थातच त्यांचे काका शरद पवार यांना राज्यभरात सहानुभूती मिळाली.

Uddhav Thackeray :
Condolences to MLA Govardhan Sharma : ‘लालाजी’ गेलेत यावर विश्वासच बसत नाही, उपमुख्यमंत्री फडणवीस भावूक

- विलासराव देशमुख यांचा पराभव

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत काही निकाल धक्कादायक लागले होते. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा पराभव हे त्यावेळचे ठळक उदाहरण. तसेच निकाल २०२४ मध्ये लागतील, असे काही राजकीय विश्लेषकांना वाटते. असे असले तरी शिवसेना सोडलेले काही आमदार, पदाधिकाऱ्यांकडे उद्धव ठाकरे यांच्याकडूनही दुर्लक्ष झाले होते. उद्धव ठाकरे यांची भेट घेणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते, असे काही आमदार, पदाधिकारी सांगतात.

विशेष म्हणजे, सध्याही तशीच परिस्थिती असल्याचे सांगितले जाते. उद्धव ठाकरे यांनी फुटीरांना धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. ते याबाबत शिवसैनिकांना सातत्याने सूचनाही देत आहेत. त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती निवडणुकीपर्यंत टिकून राहील का, हा खरा प्रश्न आहे. ती टिकावी यासाठी ठाकरे गटाकडून तर संपुष्टात यावी, यासाठी शिंदे गटासह भाजपकडूनही प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या भाषेतील गद्दारांना धडा शिकवणे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला कितपत शक्य होईल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Uddhav Thackeray :
Maratha Reservation : अण्णा बनसोडे, श्रीरंग बारणेंची झाकली मूठ...‘तो’ मोठा निर्णय घेण्याची वेळच आली नाही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com