डेंग्यूपासून संरक्षणाचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे तो डासांपासून स्वतःचा बचाव करण्याचा, मात्र जर शहरच घाणीचे साम्राज्य बनले असेल तर नागरिक स्वतःचा बचाव करणार तरी कसा? त्यातूनच डेंग्यूमुळे उमरगा (जि. धाराशिव) शहरातील दोन कोवळे जीव गेले आणि यादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सांवत काय करत होते? तर ते वादग्रस्त विधाने करत होते.
सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उमरगा या तालुक्याच्या शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील नगरपालिकेवर प्रशासकच आहेत. गेली अनेक वर्षे नगरसेवक नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासक काय करतात, असा प्रश्न शहरवासियांना सातत्याने पडतो. शहरातील गटारींच्या स्वच्छतेसाठी नगरपालिका म्हणे दरमहा 20 लाख रुपये खर्च करत असते, मात्र गटारी सर्वत्र तुंबलेल्या आहेत. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा शेजारून गटारीचे पाणी वाहत असते. लोकांना हे सर्व मुकाटपणे सहन करावे लागते.
स्वच्छता नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूची लागण झाल्यामुळे शहरातील 18 वर्षीय आणि 12 वर्षीय अशा दोन मुलांचा मृत्यू झाला. सत्यजित हणमंत देशमुख आणि ओम शिवाजी साळुंके अशी या दोन दुर्दैवी कोवळ्या जिवांची नावे. सत्यजित हा सहावीत शिकत होता, तर ओम हा पुण्यात तंत्रशिक्षण घेत होता. सुटीनिमित्त ओम हा गावी उमरग्याला आला होता. सरकार, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या दोन कुटुंबांना मोठा आघात सहन करावा लागला. तानाजी सावंत (Tanaji Savant) हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते राज्याचे आरोग्य मंत्रीही आहेत. पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी उमरग्यात अद्यापही पाऊल ठेवलेले नाही. दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतरही ते उमरग्यात आले नाहीत. या काळात त्यांनी वादग्रस्त वक्तव्यांचा धडाका लावला होता. राज्यभरात त्याची चर्चा सुरू होती.
पावसाळ्यात साथरोगांचा फैलाव होण्याचा धोका असतो. तो रोखण्यासाठी नगरपालिका, आरोग्य विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तयारी सुरू करणे अपेक्षित असते. प्रतिबंधक उपाययोजना करणे, यालाच सरकारच्या आरोग्य विभागाने प्राधान्य देणे गरजेचे असते. आता पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला तरी उमरग्यासारख्या तालुक्याच्या शहरात नगरपालिका आणि आरोग्य विभागाची तयारी शून्य असल्याचे दिसून येत आहे. सर्वच पक्षांचे राजकीय नेते इलेक्शन मोडवर गेले आहेत. त्याला राज्याचे आरोग्यमंत्री सावंत हेही अपवाद राहिलेले नाहीत. आरोग्य विभागाचा कारभार कसा सुरू आहे, साथरोगांचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत का, याची काळजी त्यांनी घेणे अपेक्षित असते.
असे असताना राज्याचे आऱोग्यमंत्री करत काय आहेत? लोक अडचणीत सापडलेले असताना आरोग्यमंत्री सावंत मात्र कुरघोड्यांचे राजकारण करत होते. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर आले की मला उलटी होते, असे सरंजामी थाटाचे विधान ते करत होते. प्रश्न विचारणाऱ्या शेतकर्याला ते औकातीत राहा, असा दम देत होते. त्या शेतकर्याला त्यांचे कार्यकर्ते बळजबरीने खाली बसवत होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सौ. अर्चनाताई पाटील (Archana Patil) यांना दिलेली उमेदवारी आपल्याला पटली नव्हती, त्यामुळे मी मत मागायला आलो नव्हतो, असे ते लोकांसमोर सांगत होते.
राज्याच्या आरोग्य विभागाची अवस्था गंभीर दिसत आहे. दोन कोवळे जीव गेल्यानंतर तरी सरकार, आरोग्यमंत्र्यांना जाग येईल काय, असा प्रश्न आहे. पालकमंत्री असलेले सावंत आतातरी उमरग्यात येतील आणि स्थितीचा आढावा घेतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकांचा कारभार सुरू आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासक आणि कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे. तक्रारी करून लोक थकले आहेत, मात्र त्यांची दखल घेतली जात नसल्याने लोक हैराण झाले आहेत. दोन जीव गेल्यानंतर जिल्हाधिकारीही उमरग्याकडे फिरकलेले नाहीत, हेही चिंताजनकच म्हणावे लागेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.