

Worli constituency news : शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंना आठ दिवसांतच दुसरा धक्का दिला. ठाकरेंच्या पक्षाचे उपनेते व विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिर आता शिवसेनावासी झाले आहेत. ठाकरे यांच्या केवळ पक्षासाठीच नव्हे तर आमदार आदित्य ठाकरे यांच्या राजकारणासाठीही ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.
सचिन अहिर यांचे शिंदेंच्या गोटात जाणे, हे केवळ ठाकरेंचा एक आमदार फोडला, एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. ही भविष्यातील ठाकरेंच्या राजकारणाला शह देण्याची सुरूवात म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अहिर यांनी अद्याप शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याचे समोर आलेले नाही. मात्र, ही तांत्रिक बाब आहे. मुळात ते २०२२ पासून विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते शिवसेनेचेच आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित होणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.
आदित्य ठाकरेंना धोका
आदित्य ठाकरे यांच्यासाठी अहिर यांनी सोडून जाणे, मोठा झटका ठरू शकतो. अहिर हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २००९ ची विधानसभा निवडणूक ते याच मतदारसंघातून जिंकले होते. त्याआधी १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत ते शिवडी मतदारसंघातून विजयी झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुनिल शिंदे यांनी त्यांचा वरळीत पराभव केला होता. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी जुलै महिन्यात अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर २०२० पासून ते पक्षाचे उपनेते आहेत. २०२२ मध्ये पक्षाने त्यांना विधानपरिषदेत पाठविले. अहिर यांच्यासाठी ठाकरेंनी त्यावेळी पायघड्या घातल्या होत्या. याचे कारण होते वरळीतील त्यांचे राजकीय वजन. वरळी मतदारसंघात अजूनही अहिर यांचा दांडगा संपर्क आहे. बीडीडी चाळीपासूनच अहिर यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता.
कामगार संघटनांमध्येही अहिर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. याच माध्यमातून त्यांचे राजकारण आजपर्यंत टिकून आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहिर हे पुन्हा राष्ट्रवादीकडून उमेदवार असते. मात्र, त्यांना पक्षात घेत ठाकरेंनी मतदारसंघातील विरोधकांची ताकद कमी केली. अहिर यांच्या प्रवेशामुळे ठाकरेंविरोधात विरोधकांना मातब्बर चेहराच मिळाला नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंना ९० हजारांच्या जवळपास मते मिळाली होती.
२०२४ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेतील फुटीमुळे आदित्य ठाकरेंना मिळालेले मतदान सुमारे ६३ हजारांपर्यंत खाली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी जवळपास ५४ हजार मिळवत त्यांना जेरीस आणले होते. अहिर यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंसाठी जीवापाड मेहनत घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ते ठाकरेंच्या गळ्यातील ताईत बनले होते. ठाकरेंच्या विश्वासू नेत्यांमध्ये त्यांची वर्णी लागली होती.
एकनाथ शिंदे यांनी आता अहिर यांनाच गळाला लावत आदित्य ठाकरेंची आमदारकीच धोक्यात आणली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप साडे तीन वर्षांचा कालावधी आहे. मात्र, अहिर यांना पक्षात घेऊन थेट विधानपरिषदेचे उपसभापती पद देत शिंदेंनी आदित्य यांच्यासमोर एकप्रकारे मोठे आव्हान उभे केले आहे. शिवबंधन तोडत अहिर यांनी आदित्य यांच्या अडचणी वाढविल्या आहेत.
अहिर हे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळीतील शिवसेनेचे उमेदवार म्हणून पुढे आल्यास, आश्चर्य वाटायला नको. शिंदे यांच्याकडेही या मतदारसंघात ठाकरेंना आव्हान देणारा उमेदवार नव्हता. आता अहिर यांच्या रुपाने त्यांना तगडा नेता हाती लागला आहे. या माध्यमातून शिंदे थेट ठाकरे कुटुंबावर घाव घालण्यासाठी चक्रव्यूह तर तयार करत नाहीत ना, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.