Dharashiv Loksabha : ठाकरेंच्या शिलेदाराचा बंदोबस्त करण्यासाठी शिंदे, अजितदादानंतर फडणवीसही उतरले मैदानात !

Political News : धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजप वापरणार धक्कातंत्र, इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे.
Uddhav Thackeray-Ajit Pawar - Devendra Fadnavis-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Ajit Pawar - Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे आतापासूनच उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. ठाकरेंचा शिलेदार, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर दुसऱ्यांदा मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) धाराशिवसाठी आग्रही असून, खासदार ओमराजेंना दुसऱ्या टर्मला रोखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धाराशिवमध्ये इंटरेस्ट दाखवल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून आता सुधीर पाटील यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे आगामी काळात कोण रिंगणात उतरणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. काहीजणांनी उघडपणे इच्छा व्यक्त केली आहे, तर काहीजण संधीची वाट पाहत आहेत. अशीच संधी साधत दोन दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांनी इच्छुक असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत आणखी काही नेते समोर येण्याची शक्यता आहे.

महायुतीत धाराशिव लोकसभा मतदारसंघ कोणाला सुटणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. महायुतीतील तिन्ही पक्षांतील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी तयारी सुरू केली आहे. मतदारसंघात त्यांनी भेटीगाठी वाढवल्या आहेत.

Uddhav Thackeray-Ajit Pawar - Devendra Fadnavis-Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : निश्‍चिंत राहा, हा जिल्हा मुकुल वासनिकांचा आहे !

राष्ट्रवादी काँग्रेसमधून सध्या प्रा. बिराजदार यांचे एकट्याचेच नाव समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटातही अनेकजण इच्छुक आहेत. माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय सावंत यांनी उघडपणे इच्छा व्यक्त केली आहे. शिंदे गटातून आणखी एक, दोन जण इच्छुक आहेत. मात्र, त्यांनी उघडपणे इच्छा व्यक्त केलेली नाही.

शिवसेना-भाजप युती असताना धाराशिव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. त्यानुसार महायुतीतील शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघावर दावा ठोकला आहे. भाजपने मतदारसंघावर दावा केला नाही. मात्र, पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे.

भाजपकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचेही नाव धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी अधूनमधून चर्चेत येत आहे. घाई न करता प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांनी उमेदवारीच्या स्पर्धेत आता उडी घेतली आहे. आणखी काहीजण इच्छुक असून, येत्या काही दिवसांत तेही उघडपणे समोर येण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही महिन्यांपूर्वी धाराशिव शहरात सुधीर पाटील यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी अनेक नेत्यांनी स्पर्धेच्या उद्घाटनाला आणि समारोपाला हजेरी लावली नव्हती. त्याचे खापर सुधीर पाटील यांनी भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगतिजसिंह पाटील यांच्यावर फोडले होते.

आमदार पाटील यांनी ते आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले होते. सुधीर पाटील यांनी त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन तुळजापूर विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. आता सुधीर पाटील यांनी लोकसभा उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्याने भाजपमध्ये पक्षांतर्गत घडामोडी वाढतात का, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.

Uddhav Thackeray-Ajit Pawar - Devendra Fadnavis-Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : करा किंवा मरा! काँग्रेसच्या स्थितीवर नाना पटोलेच बोलले...

धाराशिव मतदारसंघ जर भाजपला सुटला तर उमेदवारीसाठी धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मोदी लाटेतही त्यांनी 4,64,747 मते मिळवली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) विजयी झाले होते. त्यांना 5,91,605 इतकी मते मिळाली होती. आता आमदार पाटील हे भाजपमध्ये आहेत आणि शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजितदादा पवार गट भाजपसोबत आहे. त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील हे योग्य उमेदवार ठरू शकतात, असाही मतप्रवाह पक्षात आहे.

दरम्यान, प्रवीणसिंह परदेशी यांच्यासाठी एका संस्थेमार्फत मतदारसंघात सर्वेक्षण केले जात आहे. पोस्टर, बॅनरबाजी करणाऱ्यांना भाजपमध्ये उमेदवारी दिली जात नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही इच्छुक सावध झाले आहेत. मतदारसंघ भाजपला सुटलाच तर उमेदवारी कोणाला मिळणार, हे अखेरपर्यंत बाहेर येणार नाही. भाजप (Bjp) धक्कातंत्रांचा वापर करणार, असे सांगितले जात आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांच्या रूपाने इच्छुकांमध्ये एका नावाची भर पडली आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

R

Uddhav Thackeray-Ajit Pawar - Devendra Fadnavis-Eknath Shinde
Dharashiv Loksabha Constituency : धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीचा घोळ मिटेना ; शिंदे - पवार गटात रस्सीखेच...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com