Maharashtra Political News : गेल्या चार वर्षांतील राज्यातील घटनाक्रम हा सरकारच्या अस्थिरतेचा साक्षीदार ठरला आहे. या चार वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री आणि बरेच मंत्री पाहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मात्र या राजकीय अस्थिरतेच्या कारकिर्दीत गेल्या चार वर्षांत तीनदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
विशेष म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ते राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत हे विशेष. चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पहाटे घडलेला सगळा घटनाक्रम अत्यंत नाट्यमय होता. अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली पहाटेची उपमुख्यमंत्रिपदाची शपथ औटघटकेची ठरली होती, मात्र त्यानंतर पुन्हा त्यांना कधीच मागे फिरून पाहावे लागले नाही.
महाराष्ट्राने गेल्या चार वर्षांच्या कारकिर्दीत तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री आणि बरेच मंत्री पाहिले. राज्यातील सरकारच तेवढं अस्थिर होते... चार वर्षांपूर्वी पहाटेच्या शपथविधीवेळी स्थापन झालेले सरकार अवघं अडीच दिवस टिकले होते. त्यानंतर पुढे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले ते चांगले अडीच वर्षं टिकले. हे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल असे वाटत असतानाच एकनाथ शिंदेंच्या एका बंडाने शिवसेनेचे ४० आमदार व १३ खासदार फोडले. त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सत्तेत आले. त्यावेळी सुरुवातीचे एक वर्ष अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदापासून दूर राहावे लागले होते. मात्र, या महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत नाही, तोपर्यंतच पुन्हा एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत शिवसेनेप्रमाणे फूट पाडून ४० आमदार व २ खासदार फोडत अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. तर त्यांच्यासोबतच ९ आमदारांनी डायरेक्ट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता डबल इंजिनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या नऊ मंत्र्यांची साथ लाभल्याने महायुती सरकारला ही तीन इंजिन जोडली गेली आहेत.
महाविकास आघाडीचा प्रयोग जितका जोरदार आणि धक्कादायक होता, त्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक धक्कादायक ठरले ते एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यानंतर २०२३ मध्ये अजित पवार यांना फोडून पुन्हा महायुतीसह सत्तेत येणे. या सगळ्या राज्यातील राजकारणातील उलथापालथीचा राजकीय इतिहास संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक कधीच विसरणार नाहीत. त्यामुळे इतिहासात या चार वर्षांच्या कारकिर्दीचा धक्कादायक अशाच पद्धतीने नोंद घेतली जाईल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देवगिरी या सरकारी निवासस्थानी २ जुलै २०२३ ला अजित पवार यांनी बैठक बोलावली होती. या वेळी छगन भुजबळ लोणावळ्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा त्यांना फोन आला. त्यावेळी भुजबळ म्हणाले, मी सध्या लोणावळ्यात आहे. या बैठकीला जातो अन् अजित पवार गटाच्या काय हालचाली चालल्या आहेत, ते पाहतो. त्याप्रमाणे तुम्हाला निरोप देतो, असे सांगत भुजबळ त्या बैठकीला गेले अन् तास - दोन तासांतच त्यांनी अजित पवार यांच्यासह मंत्री पदाची शपथ घेतली.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची २ जुलै २०२३ ला बैठक बोलावली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते होते. त्यानंतर अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम आणि संजय बनसोडे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होती तुम्हाला माहीत होते. एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले मोठे नेते (शरद पवार) आणि प्रफुल्ल पटेल तसंच भाजपचे वरिष्ठ नेते मी आणि देवेंद्र फडणवीस होतो. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्र फडणवीसांना त्यांनी (शरद पवार) सांगितलं कुठेच काहीही बोलायचं नाही. आता नेत्यांनी सांगितल्यावर मी कसा कुठे बोलेन? मी शांत राहिलो.” असे म्हणत अजित पवार यांनी ५ जुलै २०२३ च्या सभेत पहिल्यांदा पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला.
(Edited by Sachin Waghmare)