

Bihar Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपचे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जातात. ते प्रत्येक निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची करत जिंकण्यासाठीच लढतात. त्यात पक्षश्रेष्ठींपासून ते भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत नेटवर्क हे अतिशय नियोजनपूर्वक वापरले जाते. मोदी-शहांनी आजपर्यंत अनेकदा धक्कातंत्र वापरले असल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्रात जसं देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व भाजपनं (BJP) अचानक पुढे आणलं, त्याच दिशेनं बिहारचं पुढचं राजकारण जाणार असल्याची चर्चा आत्तापासूनच जोर धरू लागली आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए बिहार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. पण सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जेडीयू नेते राजीव रंजन सिंह, ज्यांना लल्लन सिंह म्हणूनही ओळखले जाते, त्यांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ३० ऑक्टोबर रोजी तारापूर येथील एका सभेत अमित शाह म्हणाले, "सम्राटजी यांना विजयी करा, मोदीजी त्यांना मोठा माणूस बनवतील. अमित शाह यांच्या या विधानामुळे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मुख्यमंत्री पदाचे संभाव्य दावेदार म्हणून स्पष्ट झाले आहेत.
बिहारच्या निवडणुकीत प्रचारावेळी अमित शाहांनी पंतप्रधान मोदींना मध्यस्थी ठेवून टाकलेल्या या नव्या बॉम्बनं नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षासह भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच शहांचं हे वक्तव्य हे निकालानंतर बिहारच्या राजकारणात होणार असलेल्या मोठ्या राजकीय धमाक्याचे तर संकेत नाही नाअशी शंकेची पाल राजकीय विश्लेषकांच्या मनात चुकचुकली आहे.
याचदरम्यान, जेडीयू नेते आणि केंद्रीय मंत्री लल्लन सिंह यांनीही बिहारचा (Bihar) मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाणार असल्याचं सांगत विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच राजकीय गोंधळ उडवून टाकला. या भाजपच्या या दोन्ही दिग्गज नेत्यांनी केलेल्या दाव्यांमुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचेच संकेत मानले जात आहेत.
बिहारमध्येही 'महाराष्ट्रातला फडणवीस पॅटर्न' पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जसं 2022 मध्ये शिवसेनेसोबत सत्तास्थापन केल्यानंतर भाजपपेक्षा त्यांच्या कमी जागा असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. तसेचं गेल्या निवडणुकीत जेडीयूला कमी जागा मिळाल्या असतानाही नितीश कुमार यांना भाजपनं त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते.
पण गेल्या वर्षी महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवल्या होत्या,पण निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता बिहारमध्येही निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढवल्या आहेत. पण निकालानंतर तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील याबाबत मात्र, उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. अमित शाह आणि लल्लन सिंह यांच्या वक्तव्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रकाशित झालेल्या ग्राउंड रिपोर्टनुसार, सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री होतील अशी दाट शक्यता असून तारापूर विधानसभा मतदारसंघातील रहिवासी हे गृहीत धरुन चालले आहेत. नितीश कुमार यांच्याशी नव्याने युती केल्यानंतर उपमुख्यमंत्री बनलेले एक प्रमुख भाजप नेते सम्राट चौधरी यांना पक्षांतर्गत दावेदार मानले जात आहे. त्याचमुळे, अमित शाह यांच्या विधानात "मोठा माणूस" हा शब्द येत असल्याची चर्चा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सम्राटजींना निवडून द्या. मोदीजी त्यांना मोठा माणूस करतील, या विधानावरुन तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. शहांनी केलेल्या विधानामुळे चौधरी यांचे नाव भाजपचे बिहारचे मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत. पण महत्वाची बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांतलं बिहारमधलं सम्राट चौधरी यांचा प्रवासही बराचसा फडणवीसांसारखाच राहिला असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळालं होतं. तर 2020 मध्ये बिहारमध्ये भाजप-जेडीयूनंही बहुमतासह विजय मिळवला होता.पण महाराष्ट्रात भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगत भाजपसोबतची युती तोडली. यानंतर ठाकरेंनी कायम विरोधात राहिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आणलं. त्यामुळे 105 जागा जिंकूनही भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं. जे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेल्या देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेते पद स्विकारावे लागले.
यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना फुटली. 40 आमदारांसह शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यावेळीही फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशीच शक्यता असताना एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीत 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आणि फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.
बिहारच्या २०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयूनं बहुमतासह सत्ता स्थापन केली. त्यावेळीही भाजप युतीत सर्वात मोठा पक्ष ठरुनही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. यानंतर पण ऑगस्ट 2022 मध्ये तडकाफडकी जेडीयूनं भाजपसोबतची युती तोडत आणि राष्ट्रीय जनता पक्ष प्रणित महागठबंधनसोबत सत्ता स्थापन केली. युतीत मोठा भाऊ असूनही अपुऱ्या संख्याबळामुळे युतीतला मोठा भाऊ ठरुनही सत्तेतून पायउतार व्हावे लागले. भाजप विरोधी बाकांवर गेला आणि सम्राट चौधरी विरोधी पक्षनेते झाले.
बिहारच्या राजकारणात ऑगस्ट 2023 मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. त्यात नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडत पुन्हा एकदा एनडीएमध्ये परतत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. कमी जागा असूनही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री केलं. सर्वाधिक आमदार असूनही भाजपला मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं आणि उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री झाले. आता अमित शाह यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा सम्राट चौधरी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतले संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत.
या सगळ्या गेल्या वर्षांतील सर्वाधिक आमदार असूनही सत्ता गमावणं, मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडणं, धक्कादायकरित्या भूषवावं लागलेलं विरोधी पक्षनेतेपद आणि युतीत सर्वाधिक आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपद पदरात पडणं हे सगळे योगायोग फडणवीस आणि चौधरी यांच्याबाबतीत बरेचसे मिळतेजुळते असल्याचंच दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.