Badlapur Rape Case : पोलिसांच्या संवेदनशीलतेला नक्की झालंय तरी काय?

Police Badlapur Rape Case : पोलिसांनी दाखवलेली असंवेदनशीलता समाजाला हादरवून टाकणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. एकसंघपणे विचार न करता राजकीय विचारधारा, जाती-धर्मांत समाज विभागलेला राहील तोपर्यंत अशा असंवेदनशीलतेचे प्रदर्शन होतच राहील.
Police  Badlapur Rape Case
Police Badlapur Rape Case sarkarnama
Published on
Updated on

Badlapur Rape Case : माणूस म्हणून आपल्याला लाज वाटणार आहे की नाही? समाज म्हणून आपण जिवंत आहोत की मेलो आहोत? आजकाल असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. बदलापूर येथील शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर तरी असे प्रश्न पडायला हवे होते.

तक्रार नोंदवून घेण्यासाठी पीडित चिमुकलीच्या पालकांना 12 तास पोलिस ठाण्यात बसवून घेण्यात आले, असे सांगितले जात आहे. पोलिसांना संवेदनशीलता असते का? अशा प्रसंगी ती संवेदनशीलता कोणाच्या घरात पाणी भरत होती, याचा छडा लागणे गरजेचे झाले आहे.

आपण पुरुषप्रधान संस्कृतीत राहतो आणि सर्व समस्यांचे मूळ हेच आहे. महिलांना दुय्यम स्थान ते त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची दखल घेण्यापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा दिसून येतो. महिलांना प्रत्येक क्षेत्रात याला तोंड द्यावे लागते. महिलेकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचा काहीजणांचा दृष्टीकोणही यातूनच विकसित झालेला असावा.

मग अशा नराधमांच्या नजरेतून 3-4 वर्षे वयाच्या चिमुकल्या मुलीही सुटत नाहीत. बदलापूरच्या घटनेमुळे समाज म्हणून आपले तोंड काळे झालेच आहे, त्यातही पोलिसांच्या असंवेदनशीलतेने गृहमंत्रालयाकडे बोटं दाखवली जाऊ लागली आहेत.हे प्रकरण उघडकीस आले आणि असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करण्याची जणू चढाओढच सुरू झाली.

Police  Badlapur Rape Case
Badlapur News : अक्षय शिंदेऐवजी अकबर खान, शेख असता तर..., बदलापूर प्रकरणावरून अंधारेंचा नितेश राणेंवर हल्लाबोल

या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या 'सकाळ'च्या महिला पत्रकाराशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा तोल सुटला. त्यांनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह, निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरेतर म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी होती, पण तसे झालेले नाही.

तक्रार दाखल करून घ्यावी, यासाठी पीडित मुलींचे पालक 12 ते 18 तास वणवण फिरत होते, मात्र पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पोलिसांनी पालकांना 12 तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले, असेही सांगितले जात आहेत.

मुलींवर ज्या शाळेत अत्याचार झाला, त्याचे पदाधिकारी एका राजकीय पक्षांशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बदलापूरच्या लोकांनी तसे स्टेट्स ठेवल्याचे समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. शाळेचे पदाधिकारी राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे तर पोलिसांची संवेदनशीलता हरवली नव्हती ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पालक 12 तास पोलिस ठाण्यात बसून असतील तर यादरम्यान पोलिसांनी कोणाशी संपर्क साधला, पोलिसांना कोणाचे कॉल आले, याचा छडा लावणे गरजेचे झाले आहे. हे प्रकरण दाबण्याचा तर प्रयत्न झाला नाही ना, हेही यातून समोर येऊ शकते. या सर्व बाबींचा उद्रेक झाला आणि बदलापूरचे नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी दगडफेकही केली.

आता यातही वामन म्हात्रे यांनी वेगळा अँगल आणला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हे लोक रस्त्यावर उतरवण्यात आले होते, ते स्थानिक नव्हते असा दावा त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही असेच बोलत आहेत. बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते, असे त्यांनी म्हटले आहे. पण खरंतर पोलिसांनी असंवेदनशीलता का दाखवली, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनाही द्यावे लागणार आहे.

Police  Badlapur Rape Case
Manoj Jarange Patil : सरकारचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, लढायचे का पाडायचे ? निर्णयाची बैठक पुढे ढकलली...

एकच धर्म महिला धर्म

बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील काही आरोपींची न्यायालयाने सुटका केली होती. आरोपी बाहेर आल्यानंतर एका राष्ट्रीय पक्षाच्या काही नेत्यांनी फुलांचे हार घालून त्यांचे स्वागत केले होते. यामुळे समाजात कोणता संदेश जाईल, याचा सारासार विचार त्यावेळी करण्यात आला नव्हता. त्यामुळेच बदलापूरचे प्रकरण घडले, असे म्हणता येणार नाही. अत्याचार करणाऱ्यांना मानसन्मान देण्याइतपत आपली घसरण झाल्याचे ते निदर्शक होते. अत्याचार, गुन्हे घडल्यानंतर उठसूठ आरोपींचा धर्म शोधणाऱ्यांनीही आता सावध झाले पाहिजे. गुन्हेगारांना जात-धर्म नसतो आणि नराधमांच्या नजरेत महिलेचा केवळ एकच धर्म असतो, तो म्हणजे महिला धर्म.

सत्ताधारी नेते संयम सुटल्यासारखे...

हे प्रकरण राज्य सरकारवर शेकणार, हे निश्चित मानले जात आहे. पोलिसांची दिरंगाई आणि आंदोलनावरील शंका ही त्याची प्रमुख कारणे ठरणार आहेत. घटना घडल्यानंतर अनेक दिवस गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पालकांनाही ताटकळत ठेवण्यात आले. पीडित मुलींच्या पालकांची अवस्था काय झाली असेल, याची कल्पनाही करवत नाही.

त्यातच सत्ताधारी पक्षांचे नेते संयम न बाळगता तोल सुटल्यासारखी विधाने करू लागली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे महायुतीला महागात पडू शकते. यातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करून भागणार नाही. असंवेदनशीलता दाखवल्याबद्दल बडतर्फ करून त्यांच्यावर खटले दाखल करण्याची गरज आहे. मात्र होतयं काय? की आंदोलन राजकीय हेतून प्रेरित होते, असे खुद्द मुख्यमंत्रीच म्हणत आहेत. आता समाज म्हणून आपण काय भूमिका घेणार, हे महत्वाचे आहे.

(Edited By Roshan More)

Police  Badlapur Rape Case
Badlapur Rape Case : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com