Beed Masjid Blast Case: हिंदू-मुस्लिम एकोप्याचे अनोखे दर्शन! अर्धमसल्याने दिला संदेश; समाजकंटकांचा डाव हाणून पाडला...

Hindu-Muslim Unity Beed : रमजान ईदच्या आदल्या दिवशी बीड जिल्ह्यातील अर्धमसला येथे मशिदीत स्फोट झाल्यामुळे दोन्ही समाजांतील शांतताप्रिय नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. स्थानिक हिंदू आणि मुस्लिमांनी दाखवलेला संयम, एकोपा कौतुकास्पद ठरला आणि त्यामुळे अनर्थ टळला.
Beed Masjid Blast Case
Beed Masjid Blast CaseSarkarnama
Published on
Updated on

Beed News: मशिदीत स्फोट घडवून आणला जातो आणि त्याच दिवशीचा इफ्तार हिंदू-मुस्लिम समाजातील नागिरक त्याच मशिदीत एकत्र येऊन करतात! सामाजिक सलोख्याची वीण किती घट्ट आहे, हे या इफ्तारने दाखवून दिले. शिवाय समाजकंटकांना, दोन समाजांत फूट पाडू पाहणाऱ्या शक्तींना नेहमीच थारा मिळणार नाही, हेही त्यातून समोर आले आहे. फूट पाडू पाहणाऱ्या दोन्ही बाजूंच्या कट्टरवादी लोकांनी यापासून वेळीच धडा घ्यायला हवा. लोकांना शांततामय सहजीवन हवे आहे, हे यातून अधोरेखित झाले आहे.

रमजान ईद हा इस्लाम धर्मीयांसाठी अत्यंत महत्वाचा सण असतो. रमजानचा पूर्ण महिना पवित्र समजला जातो. महिनाभर कडक उपवास केले जातात आणि महिनाअखेरिस चंद्रदर्शन झाले की दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते.

बाजारपेठेला उत्साहाचे भरते आलेले असते. या उत्साहाला गालबोट लागेल अशी विधाने काही जणांकडून रमजानच्या महिन्यात सुरू होती. ईदच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे तर सर्वांना धक्का बसला. हिंदू-मुस्लिम धर्मीयांनी एकोप्याचे अनोखे दर्शन करत समाजकंटकांचा डाव हाणून पाडला.

बीड जिल्ह्यातील अर्धमसला (ता. गेवराई, जि. बीड) गावातील मशिदीत दोन तरुणांनी जिलेटीनच्या कांड्यांनी स्फोट घटवला. या मशिदीचे बांधकाम पूर्णत्वाकडे होते. ईदच्या दिवसापासून मशीद खुली होणार होती.

गावातील एका दर्गाहच्या उरुसानिमित्त काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत वाद झाला होता. त्यातूनच या दोन तरुणांनी मशिदीत स्फोट घडवला, अत्यंत संवेदनशील अशा प्रसंगी हा प्रकार घडला होता. त्यामुळे दोन्ही समाजांतील शांतताप्रिय नागरिकांच्या काळजात धस्स झाले होते. स्थानिक हिंदू-मुस्लिमांनी दाखवलेल्या संयम आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला.

Beed Masjid Blast Case
Mahayuti Politics : लोकच विरोधी पक्षाच्या भूमिकेत आले? हे तर महायुतीने ओढवून घेतलेले संकट

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राला जणू कोणाची तरी दृष्ट लागल्यासारखे प्रकार घडत होते. घटनात्मक पदावर बसलेल्या काही नेत्यांकडून हिंदू-मुस्लिमांमध्ये दुफळी माजवणारी वक्तव्ये केली जात होती. दोन्ही धर्मीयांनी हा डाव हाणून पाडला, मात्र नागपूरच्या दंगलीने त्याला गालबोट लागले.

छत्रपती शिवराय, शंभूराजांबाद्दल अवमानकारक विधाने, औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण, यामुळे शांतताप्रिय नागरिकांची चिंता वाढली होती. यंदाची ईद कशी साजरी होणार, असाही प्रश्न पडला होता. त्यातच मशिदीतील स्फोटाने अस्वस्थता वाढवली होती.

एखाद्या गावात किंवा शहरात एखादी अप्रिय घटना घडली की स्थानिक नागरिक कसे वागतात, यावर सर्वकाही अवलंबून असते. दोन्ही धर्मांतील स्थानिक नागरिकांनी संयम राखून कायद्यावर, पोलिसांवर विश्वास दाखवला की अनर्थ टळतो, हे अर्धमसला येथील नागरिकांनी दाखवून दिले आहे.

मशिदीत स्फोट घडवणाऱ्यांना त्यांच्या धर्मातील लोकांनी पाठिशी घातले नाही. उलट गावातील हिंदू-मुस्लिम एकत्र आले. त्यामुळे फूट पाडू पाहणाऱ्या असामाजिक तत्त्वांचे फावले नाही आणि राज्यभरातील शांतताप्रिय नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

Beed Masjid Blast Case
Nagpur Politics: भाजपचा काँग्रेस-शरद पवारांना दे धक्का! 12 नगरसेवक गळाला

ईदच्या आदल्या दिवशी घडलेल्या या प्रकारावर मुस्लिम समाजाकडून फारशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाहीत. या प्रकरणात कायदा, पोलिस आपले काम करतील, असा विचार या समाजाने केल्याचे दिसून आले. ईदची नमाज झाल्यानंतर विश्वकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.

अर्धमसला येथील घटनेची ईदगाहवरही चर्चा झाली नाही. हे शक्य झाले ते अर्थमसला येथील हिंदू-मुस्लिमांनी दाखवलेल्या एकोप्यामुळे, पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे. या प्रकरणात बीड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे राज्यभरात कौतुक झाले.

हिंदू-मुस्लिम धर्मीयांमघ्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. दोन्ही बाजूंचे कट्टरवादी लोक यात मागे राहत नाहीत. जमिनीवर मात्र वेगळी परिस्थिती आहे. लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. महागाईने कंबरडे मोडले आहे.

ग्रामीण भागातील तरुणाई व्यसनांच्या आहारी गेली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत नको त्या मुद्द्यांवरून आपसात भांडण्यासाठी कोणाला वेळ आहे? काही रिकामटेकडी टाळकी असतात, त्यांना असे प्रकार सुचतात. अर्धमसल्याच्या हिंदू-मुस्लिमांनी अशा टाळक्यांचा डाव हाणून पाडला आहे.

सरकार आणि राजकीय पक्षांनीही या घटनेपासून बोध घेतला पाहिजे. स्फोट झालेल्या मशिदीत त्याच दिवशीचा इफ्तार हिंदू-मुस्लिम धर्मीयांनी मिळून केला. खासदार बजरंग सोनवणे, माजी आमदार बदामराव पंडित यांनी इफ्तारला हजेरी लावली, हे अत्यंत महत्वाटे ठरले. निवडणुकीच्या राजकारणात ध्रुवीकरणामुळे कोणाचा तरी फायदा होतो, मात्र सामाजिक सलोख्याला नख लागण्याचा धोका असतो.

नागरिकांनी ठरवले तर असे डाव हाणून पाडले जाऊ शकतात, हे अर्धमसल्याने दाखवून दिले. असामाजिक तत्त्वांनी, काही राजकीय नेत्यांनी कितीही प्रयत्न केले तरी हिंदू-मुस्लिम एेक्याचा बालेकिल्ला अभेद्य राहणार, असा संदेश अर्धमसल्याच्या नागरिकांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com