
Mumbai News : राज्य विधिमंडळाचे पावसाळी आधिवेशन 30 जूनपासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला 232 आमदारांचा पाठिंबा आहे. तर दुसरीकडे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीकडे केवळ 46 आमदार आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून अधिक काळ झाला विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली जाणार का? याकडे लक्ष लागले आहे.
त्यातच गेल्या काही दिवसापासून या पदासाठी इच्छुक असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव गेल्या काही दिवसापासून नाराज आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र, त्यांच्या नाराजीचे कारण वेगळेच असल्याची चर्चा रंगली असून त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाला 'मातोश्री'कडून हिरवाकंदील मिळत नसल्याची चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडीकडून अर्थसंकल्पिय अधिवेशनात शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस असणारे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले होते. त्यावर योग्य वेळी निर्णय घेऊ, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या अधिवेशनात भास्कर जाधव यांची निवड होण्याची शक्यता गृहीत धरली होती. त्यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड होत नसल्याने नाराज असल्याची चर्चा रंगली होती.
आठ दिवसापूर्वीच शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा झाला. यावेळी घणाघाती भाषण करीत भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षावर मोठा हल्लाबोल केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदार व आमदार यांची बैठक पार पडली होती. या बैठकीला देखील भास्कर जाधव हजर होते. त्यानंतर दोन दिवसातच चिपळूणला गेल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे देखील स्पष्ट केले होते. त्यामुळे या नाराजीवर पडदा पडेल, असे वाटत होते. मात्र त्यांची नाराजी दूर झाली नाही.
भास्कर जाधव यांच्या नाराजीचे कारण वेगळेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आठ महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आशिष जयसवाल यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार असे फायनल झाले होते. मात्र, आशिष जयस्वाल यांना मंत्रिपद दिले तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याने ते सांगितल्याप्रमाणे वागतील, असे एकनाथ शिंदेंना सांगण्यात आले. त्यानंतर शिंदेंनी जयस्वाल यांना कॅबिनेटऐवजी राज्य मंत्रिपद दिले होते.
त्याचप्रमाणे आता भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याबाबतीत घडत असल्याची चर्चा आहे. जाधव हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले तर ते देवेंद्र फडणवीस यांना चालतील, असा निरोप कोणी तरी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी जाधव यांच्या नावाला होकार दर्शवला असल्याची चर्चा ही दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे जाधव यांच्या नावाला संमती देत नसल्याचे समजते. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
त्यासोबतच येत्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना जर मनसेसोबत जाणार असेल तर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाला महाविकास आघाडीतील काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देतील का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार याची चर्चा नव्याने होणार असल्याने जाधव हे नाराज असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.