
Mumbai News : ओबीसीचा महाएल्गार मेळावा बीड येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थित पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने ओबीसी समाजाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे मेळाव्यानंतर जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचे प्रकर्षाने जाणवले. या मेळाव्याला आठ ते दहा दिवसापूर्वी नागपूरमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या मेळाव्याला उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी दांडी मारली. त्यावरूनच या ओबीसी नेत्यांमध्ये पुन्हा बिनसले असल्याचे उघड झाले आहे. त्यासोबतच यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी माजी मंत्री विजय वडेट्टीवारांचा लाव रे तो व्हिडीओ म्हणत विमान जमीनीवर आणले असल्याची जोरदार चर्चा मेळाव्यानंतर रंगली होती.
राज्य सरकारने 2 सप्टेंबरला जीआर काढून हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा घाट घातला जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या सरकारकडून घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आता ओबीसी समाजबांधव आक्रमक झाले आहेत. या सरकारच्या निर्णयाच्या विरोधातच राज्यभरातील ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
एकीकडे राज्य सरकारच्या या निर्णया विरोधात नागपूमध्ये माजी मंत्री माजी मंत्री विजय वडेट्टीवार, ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवडे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडला होता. या मेळाव्यातून महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावेळी ओबीसीमधील काही नेते गैरहजर होते. तर बीडमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यास वडेट्टीवार, बबनराव तायवडे हे नेतेमंडळी गैरहजर होते.
त्यामुळे ओबीसीमध्ये दोन गट असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे वडेट्टीवार हे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते आहेत. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ हे सत्ताधारी महायुतीमधील नेते आहेत. त्यामुळे ओबीसी समाजातील हे नेते वेगवेगळे मेळावे घेत आहेत.
त्यातच बीडमध्ये झालेल्या या मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना खिंडीत पकडले आहे. भुजबळ यांनी या व्हिडिओमधून वडेट्टीवारांची दुटप्पी भूमिका उघड करीत त्यांच्यासमोरील अडचणी वाढविल्या आहेत.
ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी राज्यातील विविध भागात ओबीसींच्या महाएल्गार रॅली निघाल्या. नागपूरमध्ये काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. पण मी त्या मोर्चाला गेलो नाही त्याचं कारण आज मी तुम्हाला सांगतो. लाव रे तो व्हिडिओ...असे म्हणत भुजबळ यांनी व्हिडिओ लावला. यावेळी व्यासपीठावर मनोज जरांगे यांना उपोषणस्थळी जाऊन भेट दिल्याचा वडेट्टीवारांचा व्हिडिओ लावण्यात आला.
या व्हिडिओत वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं की, मराठवाड्यातील जो निजामाच्या काळातील मराठा समाज आहे त्याला कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण द्या, अशी आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. यावरुन वडेट्टीवार हे डबल ढोलकी प्रमाणं वागत आहेत. जरांगेंसोबत वेगळं बोलतात आणि ओबीसीच्या व्यासपीठावर वेगळं बोलतात, असा आरोप करत वडेट्टीवारांचा दुटप्पीपणा उघड करीत चांगलेच खिंडीत पकडले आहे.
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ हे वारंवार ओबीसी नेत्यांनाच लक्ष्य करत आहेत. वडेट्टीवार हे काँग्रेसमधील ओबीसी नेते असून, त्यांच्यावर टीका करून भुजबळ यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. भुजबळ व ओबीसी नेत्यांच्या आपापसातील या संघर्षाने काँग्रेस पक्षाची कोंडी झाली आहे. एका बाजूला मराठा व्होटबँक आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी व्होटबँक जपताना वडेट्टीवार यांना भुजबळांच्या हल्ल्यामुळे माघार घ्यावी लागणार आहे.
मंत्री भुजबळ यांच्या या 'व्हिडीओ बॉम्ब'नंतर आता विजय वडेट्टीवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांमधील छुपा संघर्ष पुढे आला आहे. भुजबळांनी एका व्हिडीओतून वडेट्टीवारांचं विमान जमीनीवर आणले आहे. त्यामुळे आता येत्या काळात या निमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी येत्या काळात डोकेदुखी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.