
Sangli News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक बदलांवर जोर दिला आहे. त्याप्रमाणे मंडल अध्यक्ष निवडणींसह आता जिल्ह्यांच्या शहर आणि ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदांवर नियुक्त्या केल्या आहेत. राज्यातील 58 ठिकाणी या नियुक्त्या करण्यात आल्या असून यात सांगलीत जिल्ह्याचा देखील समावेश आहे. भाजपने ग्रामीणमध्ये ताकद वाढवी म्हणून तरूण चेहरा असणाऱ्या सम्राट महाडिक यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पद दिले आहे. पण भाजपच्या या कुटनिती मागे जयंत पाटील हेच टार्गेट असून त्यांना शह देण्याचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सांगलीवर मजबूत पकड आहे. यामुळे त्यांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी कट्टर विरोधक असणाऱ्या सम्राट महाडिक यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. पण जयंत पाटलांना शह देणे सम्राट महाडिक यांना इतके सोपे नसून त्यांच्यासमोर सर्वांना सोबत घेऊन जाण्यासह नव्या जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे आव्हान असेल. तर स्थानिकच्या आधी भक्कम पक्ष बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
गेल्या पाच ते सहा वर्षापासून शिराळा तालुक्यात भाजप पक्ष वाढीसाठी सम्राट महाडिक प्रयत्न करत आहेत. यामुळे त्यांना भाजपने जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदाची जबाबदारी दिली आहे. याआधी देखील वाळवा तालुक्यात भाजपने जिल्हाध्यक्षपद निशिकांत पाटील यांच्याकडे दिले होते. पण त्यांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पण भाजपने हे पद दुसरीकडे न देता दुसऱ्यांदा वाळवा तालुक्यातच ठेवले. यामागे भाजपची रणनीती फक्त आणि फक्त जयंत पाटील यांना राजकीय शह देण्याची आहे.
दरम्यान सम्राट महाडिक यांना जिल्हाध्यक्षपद देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. जयंत पाटील यांना शह देण्यासाठी सम्राट महाडिक यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर मिळालेल्या जबाबदारीतून त्यांना मित्र पक्षांना बरोबर घेऊन जावं लागणार आहे. असे झाल्यास मित्रपक्षांच्या ताकदीमुळे जयंत पाटील यांच्या समोर आगामी 'स्थानिक'मध्ये मोठे आव्हान उभं राण्याची शक्यता आहे.
वाळवा आणि शिराळा तालुक्यात जयंत पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र आता सम्राट महाडिक यांच्या रूपाने भाजप वाढीला फायदा होणार आहे. स्व. वनश्री नानासाहेब महाडिक यांच्यापासून महाडिक घराणे जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. नानासाहेब महाडिक यांच्यानंतर राहुल व सम्राट महाडिक यांनी ही परंपरा आजही सुरू ठेवली आहे. राज्यात भाजपची सत्ता नसतानाही महाडिक बंधूंनी गेल्या सहा वर्षापासून भाजपवाढीसाठी काम केलं आहे. तसेच शिराळा मतदारसंघातून विधानसभा लढवण्यासाठी 2019 मध्ये इच्छा व्यक्त केली होती. पण संधी न मिळाल्याने बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर आताही 2024 मध्ये त्यांनी तिकीट मागितले होते. मात्र पक्षाने नकार दिल्याने ते नाराज न होता पक्षाचे काम करत राहिले. त्यांनी सत्यजित देशमुख यांच्या विजयात मोठी भूमिका पार पाडल्याने सत्यजित देशमुख यांचा विजय झाला.
वाळवा शिराळा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांचे पारंपारिक विरोधक म्हणून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत पाटील, भाजपचे विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनंतराव पवार, महात्मा गटाचे गौरव नायकवडी, माजी नगरसेवक वैभव पवार अशी मोठी यादी आहे. या सर्वांची मोट बांधण्याची जबाबदारी आता सम्राट महाडिक यांना पार पाडावी लागणार आहे. तसेच त्यांना भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह मकरंद देशपांडे या ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि साथही घ्यावी लागणार आहे. पण ज्येष्ठ नेत्यांसह जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक सम्राट महाडिक यांना साथ देतात का? सम्राट महाडिक यांच्यावर भाजपने लावलेल्या डाव फायद्याचा ठरतो का? या प्रश्नांची उत्तरे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर येणाऱ्या निकालातून समोर येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.