Dharashiv Loksabha News : धाराशिव लोकसभा मतदारसंघावरून महायुतीचे घोडे अडले आहे. महायुतीकडून अनेक दिग्गज इच्छुक आहेत, मात्र ही जागा कोणाला सोडायची, उमेदवारी कोणाला द्यायची, याबाबत निर्णय होण्यास विलंब लागत आहेत. तिकडे, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मात्र प्रचाराची राळ उडवून दिली आहे.
महायुतीला माझ्याविरोधात उमेदवार मिळत नाही, अशी खिल्ली खासदार राजेनिंबाळकर उडवत आहेत. याला प्रत्युत्तर देत भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी ओमराजेंवर तिखट हल्ला चढवत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्वतःसाठी उमेदवारीची मागणी केली आहे.
महायुतीत मतदारसंघ आणि उमेदवारीचा घोळ अद्याप मिटलेला नसताना खासदार राजेनिंबाळकर यांनी मात्र गावागावांत भेटी देऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकांना समजेल अशा लोकांच्या भाषेत ते महायुतीवर हल्ले चढवत आहेत. महायुतीकडे अनेक दिग्गज नेते आहेत. असे असतानाही उमेदवारी जाहीर करण्यासाठी विलंब होत आहे, कारण जागा कोणाला द्यायची, याचाच निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे, माझ्याविरोधात लढवण्यासाठी महायुतीकडे उमेदवारच नाही, अशी टीका खासदार राजेनिंबाळकर करत आहेत. ही टीका महायुतीच्या जिव्हारी लागणारी आहे.
धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे आता बोटावर मोजण्याइतकेच दिग्गज नेते शिल्लक राहिले आहेत. महायुतीत दिग्गजांची मांदियाळी आहे. असे असतानाही उमेदवार जाहीर करण्यासाठी विलंब होत असल्याने महायुतीबाबत मतदारसंघात चुकीचा संदेश जात आहे. तो संदेश आणखी खोलवर रुजवण्यासाठी खासदार राजेनिंबाळकर या संधीचा फायदा करून घेत आहेत.
मी लोकांचे फोन उचलतो, हा नॅरेटिव्ह खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी पद्धतशीरपणे सेट केला आहे. ते लोकांचे फोन घेतात, हे खरेही आहे. या नॅरेटिव्हवर मात करणे भाजपला अडचणीचे ठरत आहे. त्यावर मात करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी पाटील यांनी खासदार राजेनिंबाळकर हे निष्क्रीय आहेत, अर्धवटराव आहेत, असा तिखट हल्ला केला आहे.
यासोबतच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी खासदार राजेनिंबाळकर यांची उमेदवारी अद्याप जाहीर का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. खासदार किती निष्क्रीय आहेत, हे सर्व जनतेला माहीत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही, यामुळे भांबावून गेलेले खासदार महायुतीकडे(Mahayuti News) माझ्याविरोधात उमेदवार नाही, अशी टीका करत असल्याचे चालुक्य यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार राजेनिंबाळकर यांना पाच वर्षांत मतदारसंघात एकही ठळक काम करता आले नाही. त्यामुळे मतदार आता जाहीरपणे जाब विचारत आहेत. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेले खासदार तोंडाला येईल ते बोलत सुटले आहेत. मागील पाच वर्षे विकासकामे केली असती तर निष्क्रियपणाचा ठपका कशाला बसला असता. आता पराभव समोर दिसत असल्याने महाविकास आघाडीवर सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
स्वतःला उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने निष्क्रीय खासदार मीच उमेदवार आहे हे भासवण्यासाठी मतदारसंघात दौरे करत सुटले आहेत आणि महायुतीला उमेदवार नाही अशी थाप मारत आहेत. जनतेला संभ्रमात टाकण्यासाठी महायुतीच्या उमेदवारीबाबत चर्चा न करता स्वतःला उमेदवारी मिळते की नाही याची काळजी करावी, अशी टीका चालुक्य यांनी केली आहे.
खासदारांच्या विरोधात हे पत्रक प्रसिद्धीस दिल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष चालुक्य यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. आपण इच्छुक असल्याचे त्यांनी याआधीही जाहीर केले होते. मात्र, आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. उस्मानाबादबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यातच आता चालुक्य यांच्या रूपाने आणखी एका इच्छुकाची भर पडली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.