
Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील 58 जिल्हाध्यक्ष दोन आठवड्यांपूर्वी जाहीर केले होते. परंतु राज्यातील उर्वरित उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची यादी स्थानिक मतभेदांमुळे रखडली होती. त्यानंतर काही ठिकाणी तडजोडी करून तर काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणिते डोळ्यासमोर ठेऊन निवडी जाहीर केल्या आहेत. या घोषणेनंतरही काही ठिकाणी नाराजी समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात हे नाराजीनाट्य दूर करण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. दुसरीकडे मुंबई महापलिका निवडणुका तोंडावर असताना मुंबई भाजपचा अध्यक्ष ठरला नाही. तीन नावांची चर्चा असली तरी अद्याप एकमत झालेले नाही, त्यामुळे निवड रखडली आहे.
पहिल्या टप्प्यातील भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही ठिकाणी नाराजी असल्याचे समोर आले होते. मात्र, हा विरोध कमी प्रमाणात होता. मात्र, दुसऱ्या टप्य्यात भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्ष निवडीची घोषणा करताना पूर्वीच्या चुका टाळल्या होत्या. पक्षातंर्गत नाराजी दूर करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करतानाच भाजपने निवडणुकीचे गणिते डोळ्यासमोर ठेऊन निवडी जाहीर केल्या. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये या पदासाठी इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. उर्वरित नावे निश्चित करण्याआधी स्थानिक नेते, आमदार-खासदार आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची चर्चा झाली. परंतु, आता नियुक्तीनंतरही नाराजी आहे. मुंबईतही काही नावांना विरोध झाला असल्याचे पुढे आले होते.
भाजपच्या राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यापूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण व केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक सिंह, सह-संघटनमंत्री शिवप्रकाश आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून जिल्हाध्यक्ष निवडीसंबंधी चर्चा केली होती. त्यांच्या बैठकीनंतरच यादी निश्चित करण्यात आली. त्यानंतर घोषणा करण्यात आली. त्यानंतरही अनेक ठिकाणी कार्यकर्त्याची नाराजी आहे. घोषणेनंतर पक्षातील मतभेद समोर येत आहेत. विशेषतः मराठवाड्यातील बीड व लातूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून मतभेद चव्हाटयावर आले आहेत.
काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री असलेले बसवराज पाटील यांना लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष केले आहे. ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. त्यांना भाजपने लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष केले आहे. बसवराज पाटील हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील रहिवाशी आहेत. ते 1999 साली उमरगा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये आले आले. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बसवराज पाटील यांचे कार्यकर्ते ही नाराज झाले आहेत.
दुसरीकडे बीड जिल्हयात अध्यक्ष निवडीवरून सुरुवातीपासून मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळेच या ठिकाणची निवड रखडली होती. मात्र, या ठिकाणच्या निवडीवरून दोन्ही गटात एकमत झाले नसल्याचे दिसत आहे. बीडचे प्रभारी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली. कडा (ता. आष्टी) येथील देशमुख कुटूंबिय दोन पिढ्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचे एकनिष्ठ आहेत. देशमुख यांच्या निवडीनंतर सुरेश धस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, यादृष्टीने सर्व संबंधितांशी प्रदेश पातळीवरून समन्वय साधण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले असले तरी काही ठिकाणी निवडीनंतर मतभेद चव्हाटयावर आले आहेत.
मुंबई भाजपचा अध्यक्ष कोण ? उत्सुकता शिगेला
मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना, भाजपने संघटनात्मक पातळीवर नवीन नेतृत्वाची नियुक्ती करून तयारी सुरु केली आहे. भाजपच्या जिल्हा किंवा शहर अध्यक्षाची निवड ही संघटनात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईसारख्या महानगरात ही भूमिका अधिकच महत्वाची ठरते कारण याठिकाणी निवडणुकांचे, प्रचाराचे आणि स्थानिक पातळीवरील निर्णयांचे नेतृत्व हे जिल्हाध्यक्षाकडेच राहणार आहे.
भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत मुंबईत नाराजीचे सूर उमटत आहेत. विविध गटांत मतभेद असल्याने निवड प्रक्रिया रखडली आहे. विशेषतः काही इच्छुकांच्या नावांवर अंतर्गत स्तरावर एकमत न झाल्यामुळे ही निवड लांबणीवर गेल्याची माहिती आहे.
मुंबई शहरचे सध्याचे अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे, त्यांच्या जागी नवीन अध्यक्षाची निवड लवकरच होण्याची शक्यता आहे. भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम व अतुल भातखळकर या तीन नावांवर चर्चा झाली असल्याचे समजते.
येत्या काळात मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच भाजपकडून लवकरच नवीन अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.
मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात भाजपसाठी जिल्हाध्यक्षाची निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या पदासाठी अनेक इच्छुक असून गटबाजी आणि स्थानिक नेत्यांच्या मतभेदांमुळे केंद्रीय नेतृत्वही संभ्रमात आहे. पक्षाकडून समन्वयासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे. मात्र नाराज गटांचे समाधान करणे ही पक्षासाठी मोठी जबाबदारी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.