Shirol Vidhansabha News : शिरोळ विधानसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र, याच बालेकिल्ल्यात विधानसभेला राष्ट्रवादीची छुपी रसद घेऊन अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर निवडून आले. लोकसभेला स्वाभिमानीला मदत करायची, पण स्वाभिमानीकडून विधानसभेला मदत होत नाही, असाच आरोप महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा आहे. सध्या 'स्वाभिमानी'चे अध्यक्ष राजू शेट्टी यांची उमेदवारी वगळता अन्य कोणत्याही पक्षाची उमेदवारी निश्चित झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम असून, महायुतीत ही जागा भाजपला की शिंदे गटाला यावर मतांचे समीकरण अवलंबून आहे.
शिरोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासोबत निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज सोबत आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्याबाबत राजू शेट्टी आशावादी आहेत. ठाकरेंनी पाठिंबा दिला तरी सहा महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील आणि स्वाभिमानी यांच्यात दिलजमाई होण्याची शक्यता आहे. मात्र, ऐनवेळी स्वाभिमानीची ही भूमिका कठोर असल्याने माजी आमदारांची भूमिकादेखील गुलदस्तात आहे.
हातकणंगलेवर शिंदे गटासोबत भाजपनेदेखील दावा केला आहे. या मतदारसंघातदेखील जैन बांधव आणि मराठा बांधवांची मोठी फळी आहे. असे असले तरी शेतकरी म्हणून हे सर्व शेट्टींच्या बाजूने कौल देणारे आहेत, तर महायुतीकडून आमदार राजेंद्र यड्रावकर, जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, असे चेहरे आहेत. पण तिरंगी निवडणूक झाल्यास शेट्टी यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवाय कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात तालुक्यातील पारंपरिक विरोधकांनी मोट बांधली होती. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, शेट्टी यांच्यासह अन्य एकत्र येत त्यांना विरोध केला होता. बँकेच्या निवडणुकीनंतर गणपतराव पाटील, उल्हास पाटील, शेट्टी यांनी तालुक्यातील निवडणुका याच पॅटर्नने लढविण्याचा निर्धारही केला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीने शेट्टी यांना पाठिंबा दिल्यास हेच चित्र पुढे राहील. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीचा निर्णय झाल्यानंतर पुढचे राजकीय चित्र स्पष्ट होईल.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.