

Rajya Sabha elections : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला अपेक्षेपक्षा चांगले यश मिळाले होते. तर भाजपसह एनडीएला अनपेक्षित धक्का बसला होता. उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या राज्यासह महाराष्ट्र अन्य काही राज्यांत भाजपला तगडा झटका सहन करावा लागला होता. त्याचा वचपा काढण्याची संधी आता भाजपला मिळणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील ९ राज्यांतील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. येत्या १६ मार्चला मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एवढ्या जागांसाठी निवडणूक होत असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे. ही निवडणूक नियमित असली तरी भारतीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे.
इंडिया आघाडीतील सर्वात ज्येष्ठ आणि मातब्बर नेते शरद पवार हे ४ एप्रिलला निवृत्त होत आहेत. महाराष्ट्रातील एकूण सात जागांसाठी निवडणूक होणार असून त्यामध्ये पवारांचीही जागा आहे. त्यांच्या पक्षाच्या खासदार फौजिया खानही यांचीही मुदत संपत आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियांका चुतर्वेदी आणि काँग्रेसच्या रजनी पाटील याही निवृत्त होत आहेत. एकाचवेळी चार जागा रिकाम्या होत असल्या तरी आघाडीकडे केवळ एकाच जागेवर उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे.
खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे सांगितले असले तरी पवार पुन्हा राज्यसभेत जाण्यासाठी तयार होतील का, हा प्रश्नच आहे. पवार यांनी याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मविआ राज्यातून एक जागा निवडून देऊ शकते. पण उरलेल्या तीन जागा गमवाव्या लागणार आहेत. या जागांवर महायुतीचा दावा राहील. महाराष्ट्रात रामदास आठवले यांच्यासह भागवत कराड आणि धैर्यशील पाटील हे भाजपचे खासदार निवृत्त होत आहेत. त्यामुळे भाजपच्या वाट्याला सातपैकी आठवलेंसह चार जागा येतील. तर शिवसेना एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळेल.
सध्याच्या राज्यसभेतील आणखी एक मोठे नाव म्हणजे माजी केंद्रीय मंत्री अभिषेक मनू सिंघवी. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून परिचित असलेल्या सिंघवी यांचाही कार्यकाळ संपत आहे. काँग्रेस पुन्हा त्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्याला राज्यसभेत पाठविणार हे अद्याप गुढ आहे. सिंघवी ते तेलंगणा राज्यातून निवडून गेले होते. तिथे काँग्रेसची सत्ता असल्याने ही जागा पुन्हा काँग्रेसलाच मिळेल, यात शंका नाही.
एनडीएची सत्ता असलेल्या बिहारमध्ये पाच जागांवर निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे नेते रामनाथ ठाकूर आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचाही समावेश आहे. तसेच राष्ट्रीय लोकमोर्चाचे उपेंद्र कुशवाह आणि राष्ट्रीय जनता दलाचे दोन सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यात एनडीएला पाचपैकी तीन जागा मिळतील.
पश्चिम बंगालमध्येही भाजपला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये चार जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी तीन जागा तृणमूल काँग्रेसची तर एक जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आहे. साकेत गोखले हे टीएमसीचे सदस्यही निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी त्यांना पुन्हा संधी देणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. टीएमसीच्या तीन जागा सहज निवडून येतील. तर राज्यात मागील निवडणुकीत डाव्यांची वाताहात झाल्याने त्यांची एक जागा भाजपकडे जाईल.
ओडिशामध्येही भाजपची ताकद वाढू शकते. राज्यार चार जागा असून सध्या सत्ताधारी भाजपकडे दोन आणि बिजू जनता दलाकडे दोन जागा आहे. भाजपची राज्यात एक जागा वाढविण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे एकूण ३७ जागांपैकी एनडीएला तब्बल २१ जागा मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांचे चार जागांचे नुकसान होईल. त्यापैकी तीन जागा महाराष्ट्रातील असतील. परिणामी वरिष्ठ सभागृहात एनडीएची स्थिती अधिक भक्कम होणार आहे. सध्या एनडीएकडे स्पष्ट बहुमत नाही. पण वर्षभरातील निवडणुकांनंतर एनडीएकडे स्पष्ट बहुमत असेल. त्यामुळे हे वर्ष भाजप आणि एनडीएसाठी रेकॉर्डब्रेक ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.