
Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूनी रान पेटवत सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचे ठरवले होते. त्यानंतर महायुती सरकारने दोन पावले मागे घेत हिंदी सक्तीचे जीआर रद्द केले होते. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसेने विजयी जल्लोष सोहळ्याचे वरळीतील डोम सभागृह दणाणून गेले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर मुद्देसूद मांडणी करत महायुती सरकारला अनेक प्रश्न केले. तर, उद्धव ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
ठाकरे बंधूंच्या ग्रँड सोहळ्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या मेळाव्याला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, शेकाप, डाव्या पक्षाचे नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे मात्र या विजयी मेळाव्याकडे काँग्रेसने पाठ फिरवली. एकही नेता हजर राहिला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषतः येत्या काळात महाविकास आघाडीतूनही काँग्रेस 'गायब' होणार का? अशी चर्चा सुरु आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. महायुती व महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र निवडणूक लढणार का? स्वबळावर लढणार याविषयी चाचपणी केली जात आहे. दुसरीकडे विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र आल्याने येत्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सेना काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मेळाव्यातील ठाकरे बंधूंच्या भाषणाचा सूर पहिला तर येत्या काळात मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष युती करतील, अशी शक्यता दिसत आहे.
त्यामुळे आता येत्या काळात महाविकास आघाडीचे काय होणार अशी चर्चा रंगली आहे. चारच दिवसापूर्वी काँग्रेस (Congress) नेत्याच्या हायकमांडची बैठक दिल्लीत पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील घडामोडीविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यातील काँग्रेस नेत्याने आगामी काळात राज्यात होत असलेल्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस महाविकास आघाडी सोडण्याची चाचपणी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या उद्धव व राज ठाकरे यांनी विजयी जल्लोष सोहळ्याचे वरळीत आयोजन केले होते. या विजयी मेळाव्याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले होते. मात्र, दुसरीकडे दिल्लीला हायकमांडची बैठक असल्याने उपस्थित राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते या विजयी मेळाव्याला दांडी मारणार हे पुढे आले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता गृहीत धरून काँग्रेसनेही सावधपणे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मतदान उद्धव ठाकरेंना मिळाले परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मतदान काँग्रेसला ट्रान्सफर झाले नाही. हा मुद्दा बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी प्रभावीपणे मांडला.
त्यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागावाटप करताना शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपात घोळ केला. त्यासोबतच काँग्रेसला त्यांनी ब्लॅकमेल केल्याची भावना आहे, अशी तक्रार काही नेत्यांनी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या काळात उद्धव ठाकरेंसोबत लढल्यास पक्षाचे नुकसान होण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूकीवर चर्चा झाली. ठाकरेंमुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत. मुंबईत तीन जागा कमी झाल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आगामी काळात होत असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असा, मानणारा एक गट आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते तर दुसरीकडे जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसच्या जिल्हा कमिटीला दिले आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष असणार आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत जागा वाटपावर एकमत झाले नाहीतर येत्या काळात काँग्रेसकडून स्वबळावर लढण्याचा हा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळेच काँग्रेसकडून चाचपणी केली जात आहे.
स्वबळावर निवडणूक लढण्याचा काही ठिकाणी काँग्रेसला फायदा होऊ शकतो. जिथे त्यांची संघटना मजबूत आहे, त्याठिकाणी फायदा होणार आहे. तर दुसरीकडे आघाडीसोबत निवडणूक लढल्यास मिळणारा एकत्रित मतांचा फायदा होणार नाही. त्यामुळे विशेषतः भाजपसारख्या ताकदवान पक्षांसमोर लढताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस काय भूमिका घेणार? याची उत्सुकता लागली आहे. मात्र, ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्याला एकही नेता हजर राहिला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषतः येत्या काळात महाविकास आघाडीतूनही काँग्रेस 'गायब' होणार का? अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.