
Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्याची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. मुंबई महापालिका वगळता इतरत्र महायुती होण्याची शक्यता कमी आहे. विशेषतः महायुतीमधील मित्रपक्षाने आतापासूनच स्वबळाची तयारी केली जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याशी तयारी सुरु केली आहे.
मुंबई वगळता शिंदेंच्या शिवसेनेने ठाणे, कल्याण-डोंबवली, पालघर, नाशिक व छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वबळ अजमावण्याची तयारी केली आहे. त्यासोबतच काही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. त्यासोबत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी बैठक पार पडली आहे. यामध्ये स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसाच्या काळात एकीकडे भाजपने राज्यभर विभागनिहाय आढावा बैठक घेत निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महायुती करण्याचा सल्ला दिला असला तरी ज्या ठिकाणी महायुती शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत महायुती होईल तर ठाणे, कल्याण-डोंबवली, पालघरमध्ये भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता आहे तर याठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत (Shivsena) मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप (BJP) व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. याठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नाशिक व छत्रपती संभाजीनगर या महापालिकेबाबत काही निर्णय झालेला नाही. मात्र, याठिकाणी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व असल्याने महायुती होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काळात याठिकाणी दोन्ही पक्ष स्वबळ अजमावण्याचा शक्यता आहे.
ठाणे महापालिका हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी भाजपने 'अब की बार 70 पार' असा नारा देत 111 पैकी 70 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. ठाण्यात इच्छुकांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला असल्याने येत्या काळात या घोषणेमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अडचणीत वाढ होणार आहे. ठाणे महापालिकेवर एक हाती वर्चस्व मिळवण्याची शिवसेनेची शक्यता कमी होणार आहे.
त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून या ठिकाणी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. राज्यात ज्या ठिकाणी शक्य असेल त्याठिकाणी महायुती करण्याच्या सूचना आहेत मात्र काही ठिकाणी जर स्थानिक स्तरावर वेगळा निर्णय होणार असेल तर आम्हाला हा निर्णय मान्य असून आम्ही ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात काही ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षात मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिक्षण आणि पदवीधर निवडणूकीसाठीही स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमिवर शिंदेंच्या शिवसेनेची पूर्व/ पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख, मंत्री, आमदारांची महत्वाची बैठक नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी ही बैठक झाली. यामध्ये स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली. निवडणुकासाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वांना देण्यात आल्या आहेत.
या बैठकित येत्या काळात होत असलेलया औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर आणि पुणे अमरावती शिक्षक मतदार निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्येही रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुतीत या निवडणुका लढवतील अशी आशाही धुसर झाल्या आहेत. या सूचना करताना निवडणुका या महायुतीत अन्यथा स्वतंत्र लढण्यासाठी तयारीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता काही ठिकाणी महायुती होण्याची शक्यता कमी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.