
Mumbai News : पावसाळी अधिवेशनच्या सुरुवातीपासूनच महायुती सरकारला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरल्याने अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच महायुती सरकारने हिंदी सक्तीबाबतचे दोन जीआर रद्द करीत दोन पावले मागे घेतली होती. त्यानंतरच्या काळात अधिवेशनाही सुरुवात सावधपणे केली होती. मात्र, ऐन अधिवेशन काळात एकनाथ शिंदेच्या (Eknath shinde) तीन शिलेदारांनी गेल्या तीन दिवसांत विविध कारनाम्यांनी सरकारमध्ये शिंदेंची कोंडी केली आहे. त्यामुळे ऐन अधिवेशन काळातच एकनाथ शिंदे चक्रव्यूहात अडकले आहेत.
अधिवेशन सुरु असतानाच आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवासातल्या कॅन्टिनमध्ये दादागिरी केली. यावेळी त्यांनी सर्वांसमोरच कँटीनच्या मॅनेजरला मारहाण केली. त्यानंतर भर सभागृहातच मंत्री शंभूराज देसाईंनी शिवराळ भाषा वापरत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांना बाहेर ये बघतोच, असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर अधिवेशनः कळत चर्चेत असलेले मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाच्या नोटीस आली तर दुसऱ्याच दिवशी नोटांच्या बंडलासह त्यांचा व्हिडीओ आला. त्यामुळे संजय शिरसाट अडचणीत आले आहेत. विरोधकांनी या तीनही नेत्यांनी आयते कोलीत हाती दिले आहे.
अधिवेशन काळात यापूर्वी सत्ताधारी मंडळींच्या रडारवर विरोधी पक्षाचे नेते असत होते. त्यावेळी खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासारख्या विरोधी पक्षामधील नेत्यांना लक्ष्य करण्यात येत होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. राऊत, देशमुख यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांना वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. आता सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते यावेळेस अडचणीत आले आहेत. शिंदे यांच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागल्याने राजकारण चांगलेच तापले आहे.
आकाशवाणी जवळच्या आमदार निवासामधील कॅन्टीनमध्ये आमदार गायकवाड यांनी जेवण मागवले होते. ते जेवण खराब असल्याचे लक्षात आले. त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टिनमध्ये जात 'मला विष खायला घालतो का' असे विचारले आणि कॅन्टिनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि संजय गायकवाड यांनी त्याला बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणावरून आमदार गायकवाड वादात अडकले आहेत.
त्यातच विधानपरिषदेच्या सभागृहात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी शिवराळ भाषा वापरत आमदार अनिल परबांना सभागृहाच्या बाहेर ये बघतोच, असे म्हणत धमकी दिली. त्यामुळे अशा प्रकारचे वर्तन करीत त्यांनी सभागृहाची शिस्त मोडली आहे. मंत्रीच असे वागत असतील तर बाकी मंडळीने काय करायचे असा सवाल विचारला जात आहे.
त्यातच फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे. 2019 ते 2025 या काळात वाढलेल्या संपत्तीचे स्पष्टीकरण द्यावे, असे या नोटीशीत म्हणण्यात आले आहे. मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेचा शेजारी बसलेला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनचा अद्याप एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित कामकाजात तरी विरोधक सत्ताधाऱ्याना घेरणार का? याची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे पुढच्या आठ्वड्यात अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे या आठवड्यातील कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांमागील शुक्लकाष्ट या आठवड्यात तरी सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.